नांदेड - राज्यात जरी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असली, तरीही संपूर्ण जिल्ह्यात मात्र या पक्षांमध्ये कायम परस्परविरोधी भूमिका होती. एक गट कायम अशोक चव्हाण यांचा पुरस्कार करणारा होता; तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट स्थानिक काँग्रेस नेतृत्त्वाच्या विरोधात होता. आता राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये गेल्यामुळे अशोक चव्हाण यांना विरोध करणारा गट संपला आहे. यामुळे भोकर मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे समीकरण जुळून आले असून, सध्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचारातही सहभागी झाले आहेत.
हेही वाचा भोकरमध्ये अशोक चव्हाणांविरुद्ध भाजपचे बापूसाहेब गोरठेकर रिंगणात
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भोकर मतदारसंघातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाध्यक्ष वसंत सुगावे पाटील यांनी आयोजित केली होती. यावेळी भोकर, मुदखेड, अर्धापूर तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पाठीशी राहून आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी त्यांनी आवाहन केले. तसेच जिल्ह्यातील राज्य पातळीवरील नेतृत्त्व जपण्यासंबंधी वक्तव्य करून आघाडीचा धर्म जपण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
हेही वाचा राजकीय सूडबुद्धीनेचं शरद पवार यांच्यावर ईडीची कारवाई - अशोक चव्हाण
यावेळी अशोकराव चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला साथ देत प्रचारयंत्रणेत सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले. महाआघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱयांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. तसेच सुशिक्षीत बेरोजगारांना पाच हजार रुपये प्रति महिना मानधन देण्यात येणार असून, सिंचन क्षेत्रातील प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने प्रचार करावे असे चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजुरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश संघटक संतोष गव्हाणे यांसह दोनही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.