नांदेड - एकीकडे अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे, तर दुसरीकडे मराठवाड्यात याच्या उलट परिस्थितीने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पावसाअभावी किडीच्या प्रचंड पादुर्भावामुळे पिके अडचणीत सापडली आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पण, पिके वाळून जात असताना याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. तसेच मुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यातून काही घोषणा करतील, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
हेही वाचा - बीड जिल्ह्यात दुष्काळाचा कळस; दुभती जनावरे कवडीमोल भावाने विकण्यास बळीराजा मजबूर
८ लाख ४८ हजार ९२७ हेक्टर सर्वसाधारण पेरणीक्षेत्र असलेल्या जिल्ह्यात आजअखेर जवळपास सर्वच क्षेत्रावर पेरणी झाली आहे. परंतु, पावसाअभावी पुन्हा एकदा पिके संकटात सापडली आहेत. पेरणी झालेल्या भागात कोवळी पिके हवेच्या झुळुकाने हलत असली तरी आगामी दोन-चार दिवसात पाऊस झाला नाही तर ते वाळण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. पण, पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात सरासरी अत्यल्प पर्जन्यमान आहे. त्यामुळे अनेक भागात पाण्याअभावी पिकेही वाळत आहेत. जिल्ह्यातील कंधार, लोहा, मुखेड, भोकर, नायगाव, धर्माबाद, हदगाव अर्धापूर, उमरी या तालुक्यात पिकांची स्थिती खूप वाईट आहे. मूग आणि उडीद पिके तर हातचीच गेली आहेत. मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घटणार हे निश्चित आहे.
हेही वाचा - खान्देशाला दुष्काळमुक्त करू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
पेरणीला विलंब झाल्यामुळे यापूर्वीच शेतकऱ्यांनी उडीद, मुगाऐवजी सोयाबीनच्या पेरणीवर भर दिला होता. मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे सर्वच खरीप पिके धोक्यात आली आहेत. आगामी तीन-चार दिवसात पाऊस झाला नाही तर पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात सरासरी अत्यल्प पर्जन्यमान आहे. त्यामुळे अनेक भागात पाण्याअभावी पिकेही वाळत आहेत. जिल्ह्यातील कंधार, लोहा, मुखेड, भोकर, नायगाव, धर्माबाद, हदगाव अर्धापूर, उमरी या तालुक्यात पिकांची स्थिती खूप वाईट आहे. मूग आणि उडीद पिके तर हातचीच गेली आहेत. तर, कापूस व सोयाबीन या पिकांवर अळी व किडीचा मोठा प्रादूर्भाव आहे. तसेच पावसाअभावी या पिकांची वाढही खुंटली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ३० व ३१ ऑगस्टला नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुराने वाहून गेलेले पिके लक्षात घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. पण, मराठवाड्यातील पाण्याअभावी वाळलेली पिके पाहून तरी सरसकट कर्जमाफी व पीकविमा मंजूर होईल का? या आशेने शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे पाहत आहेत.