नांदेड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी सायंकाळी नांदेड जिल्ह्यात दाखल झाली. त्यानंतर नवा मोंढा येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांच्यासह २४२ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
जिल्हा भाजपच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भरतीची नोंदही येथे झाली. लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपने चिखलीकर यांच्या माध्यमातून पराभूत केले. त्यानंतर पक्षाच्या जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री पहिल्यांदा नांदेडमध्ये आले असून त्यांनी शुक्रवारी येथे मुक्काम ठोकला. नांदेड शहरात दाखल होण्यापूर्वी मागील काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे काही दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल झाले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे काँग्रेसचे माजी खासदार भास्कर खतगावकर यांनी २०१४ मध्ये भाजप प्रवेशाची सुरुवात करून नंतर जिल्ह्यात पक्षाचा चांगला विस्तार केला. त्यानंतर भाजपकडून खासदार झालेल्या चिखलीकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणले. तर गोरठेकरांच्या भाजप प्रवेशामुळे उमरी व धर्माबाद नगर परिषदा आपोआप भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. या दोन तालुक्यांसह भोकर, नायगाव आदी तालुक्यांतील नगरसेवक, जि. प. , पं. स. व बाजार समिती सदस्य, पक्ष पदाधिकारी अशा सुमारे २४२ जणांच्या भाजप प्रवेशाची यादी शुक्रवारी दुपारी तयार झाली.
गेल्या ५ वर्षांत नांदेड जिल्ह्यातून भाजपतली ही सर्वात मोठी भरती असल्याचे मानले जात आहे. गोरठेकरांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आतापर्यंतची सर्वात मोठी फूट, अशी नोंद जिल्ह्याच्या राजकीय पटावर झाली. पण भोकरमध्ये नगर परिषदेत आतापर्यंत काँग्रेसने बहुमत राखले असताना ११ पैकी ५ जणांना फोडून चिखलीकर-गोरठेकर यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना धक्का दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत गोरठेकर भोकरमधून उभे राहण्यास इच्छुक आहेत.
हेही वाचा - अर्धापूर-मालेगाव महामार्गावर स्कूल बसचा अपघात; एकाचा मृत्यू, सहा जखमी
भोकर नगर परिषदेत १९ पैकी १२ नगरसेवक काँग्रेसचे होते. त्यांच्यातील केशव मुद्देवाड हे नगरसेवक पूर्वीच दुरावले आहेत. आता गोरठेकरांसोबत अनिताराम नाईक, विजया घुमनवाड, अफसरी बेगम गफ्फार, मीना दंडवे व सुवेश पोकलवार हे ५ नगरसेवक भाजपत गेले आहेत. माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर यांच्या एकतर्फी कारभाराला नेतृत्त्वाने लगाम घातला नाही. म्हणून हे पाच जण भाजपत गेल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा - येणाऱ्या विधानसभेत विरोधी पक्षनेता वंचित आघाडीचा असेल; मुख्यमंत्र्यांची भविष्यवाणी
भोकर नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे ३ नगरसेवकही आता भाजपत आले आहेत. उमरीत गोरठेकरांचे १९ नगरसेवक आहेत. त्यांनीही भाजपत प्रवेश केला. भोकर मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यातून काँग्रेसचे माजी सभापती तथा माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबुराव हेंद्रे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शशी पाटील क्षीरसागर यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
हेही वाचा - 'अशोका'चे झाड कुणाला सावली देत नाही, म्हणून नांदेडकरांनी नवीन झाड लावले - मुख्यमंत्री