नांदेड - लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना-भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाली. हा प्रकार जिल्ह्यातील माहूर येथे झाला आहे. प्रचारसभेत एकेरी व कौटुंबिक कलह निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याने हा प्रकार घडला.
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेचे हेमंत पाटील यांचा निवडणूक प्रचार वाई बाजार येथे सुरू होता. त्यावेळी सभेत भाजपचे युवा नेते सुमित राठोड यांनी राष्ट्रवादीचे नांदेड जि. प. उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. तसेच कौटुंबिक कलह निर्माण करणारे जाहीर भाष्य केले होते. हे आजच्या हाणामारीचे मुख्य कारण असल्याची नागरिकांची चर्चा आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. माहूर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत.