नांदेड - घर बांधण्यासाठी माहेरहून 3 लाख रूपये आण म्हणत शारिरीक व मानसिक छळ करून एका विवाहितेला तिच्या दोन चिमुकल्यासह विहिरीत फेकून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना कंधार तालुक्यातील गोणार गावात उघडकीस आली. याप्रकरणी कंधार पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
कंधार तालुक्यातील गोणार येथील रंजना शरद पवळे (वय 27 वर्षे) हीने घर बांधकामासाठी माहेरहून ३ लाख रुपये घेऊन ये म्हणून पती शरद पवळे, सासू मैनाबाई पवळे, सासरा पंडित पवळे, दिर मनोहर पवळे, जाऊ सुनिता पवळे हे सर्वजण सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याची माहिती माहेरी दिली होती. माहेरच्या मंडळीनी समजूत काढून सासरी पाठविले होते.
हेही वाचा - भाजप आमदाराचा शस्त्र परवाना निलंबित, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
दरम्यान, रविवारी (दि. 1 डिसेंबर) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रंजना पवळे (वय 27 वर्षे), मुलगा दिग्विजय (वय 9 वर्षे) व मुलगी वैभवी (वय 6 वर्षे) हे तिघे जण त्यांच्या शेताच्या शेजारी असलेल्या विहिरीतील पाण्यावर तरंगत होते. याची माहिती नातेवाईकांनी मृत विवाहितेचा भाऊ व्यंकटेश ढगे यांना दिली.
माहेरच्या मंडळींनी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात व्यंकटेश ढगे यांनी कंधार पोलिसांकडे तक्रार दिली असून यामध्ये सासरच्या मंडळींनी विवाहितेचा 2 चिमुकल्यासह खून केल्याचे संगितले आहे. तक्रारीवरून कंधार पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरुध्द शारिरीक व मानसिक छळ करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विकास जाधव पुढील तपास करीत आहेत.
मृतांची हत्या की आत्महत्या हे गुढ कायम असून पोलिस तपास करत आहेत. अद्यापही संशयित आरोपींना अटक झाली नसल्याची माहिती आहे.
हेही वाचा - नांदेड: कुख्यात गुंड शेरुच्या एन्काऊंटरचा तपास सीआयडीकडे