नांदेड - विंग कमांडर अभिनंदनची मायदेशी सुखरुप वापसी आणि हवाई हल्ल्याच्या 'हवेचा' ग्रामीण व शहरी भागात सकारात्मक परिणाम भाजपच्या पथ्यावर पडला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. काँग्रेसकडून आमदार अमिता चव्हाण यांचे उमेदवारीसाठी एकमेव नाव पुढे होते. ३ दिवसांपूर्वी बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी 'कदाचित' मी सुद्धा लोकसभेचा उमेदवार असू शकतो म्हणून विरोधकामध्ये 'गुगली' टाकत राजकीय डाव नव्याने मांडण्याचे समीकरण दिले आहे.
नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१४ मध्ये मोदी लाटेतही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी जवळपास ८० हजाराच्या आसपास मतांनी विजय मिळवला होता. काँग्रेसच्या प्राथमिक चाचणीतून मोदी लाट ओसरली असून राज्यात काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील असा अंदाज बांधला होता. दिल्लीच्या राजकारणातही चव्हाण यांचे मन रमत नव्हते. राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊन पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे अनेकवेळा सूतोवाच चव्हाण यांनी केले होते.
नांदेडमध्ये काँग्रेसकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी चव्हाण यांच्या पत्नी भोकर विधानसभेच्या आमदार अमिता चव्हाण यांच्या एकमेव नावावर जिल्हा कार्यकारिणीने शिक्कामोर्तब केले होते. तसा ठरावही राज्य कार्यकारीणीकडे पाठवला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमिता चव्हाण यांनी दौरा सुरू केला आहे. अनेक ठिकाणी भेटी-गाठी, विविध विकासकामाचे भूमिपूजन, सभा, कार्यकर्त्यांशी संवाद आदीच्या माध्यमातून एकप्रकारे प्रचाराला सुरुवात केली होती. एकंदरीत आमदार अमिता चव्हाण या नांदेड लोकसभेच्या उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले होते.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
दरम्यानच्या काळात नांदेडमधील एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कुणी काहीही म्हणाले, तरी मी तुम्हाला सांगतो की, नांदेड लोकसभेसाठी अशोक चव्हाणच उमेदवार असतील, असे खात्रीपूर्वक वक्तव्यही केले होते. काँग्रेसने आमदार अमिता चव्हाण यांचे नाव पुढे केले असले तरी काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेत प्रतिसाद नसल्याचे दिसत नसल्याची चर्चा आहे.
पुलवामा हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये भारतीय सैन्याचाच वाटा आहे. पण तरीही हा दहशतवादी हल्ला नेमका भाजपच्या पथ्यावर पडला असून भाजपचे पारडे पुन्हा जड झाले आहे. त्यातच काँग्रेसला वंचित बहूजन आघाडी प्रतिसाद देत नसून याचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासदार अशोक चव्हाण राजकारणात ताकही फुंकून पिणारे आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कदाचित मी ही उमेदवार असू शकतो. म्हणून एक नवा डाव समोर आणण्याच्या प्रयत्नात आहेत. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे मातब्बर नेते लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत. त्यातच मातब्बर नेत्यांमध्ये अशोकराव येतात. ऐनवेळी दिल्लीतील काँग्रेसच्या दरबारातून आदेश आल्यास लोकसभेच्या रिंगणातही उतरावे लागेल याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे 'कदाचित'च्या मागेही बरेच काही दडले आहे.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)