नांदेड - भोपाळच्या खासदार तथा भाजप नेत्या साध्वी प्रज्ञासिंह यांना धमकीचे पत्र पाठविणाऱ्या डॉक्टरला नांदेडमधून जेरबंद करण्यात आले. भोपाळ येथील दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली.
साध्वी प्रज्ञासिंह यांना दोन दिवसांपूर्वी लिफाफा मिळाला होता. या पाकिटात पावडरसह उर्दू भाषेत लिहिलेली चिठ्ठी होती. चिठ्ठीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल तसेच खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्या फोटोवर फुली मारण्यात आली. या चिठ्ठीत इसिस, इंडियन मुजाहिदीनचाही उल्लेख असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात साध्वी प्रज्ञासिंह यांनी भोपाळ पोलिसांत तक्रार केली होती. त्यानुसार भोपाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत या पाकिटाचे धागेदोरे थेट नांदेडपर्यंत पोहोचले.
हेही वाचा-'खुर्ची'साठी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचे विमानात धरणे आंदोलन
भोपाळ एटीएसचे पथक नांदेडात धडकले. या पथकाने नांदेडातून डॉ. सय्यद अब्दुल रहेमान मोहंमद उस्ताद याला ताब्यात घेतले. या डॉक्टरनेच साध्वी प्रज्ञासिंह यांना तो लिफाफा पाठवल्याचा संशय आहे. यासंदर्भात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. एटीएसचे पथक डॉ. सय्यद अब्दुल रहेमान याला पुढील चौकशीसाठी भोपाळला घेऊन गेले आहेत.
हेही वाचा-काँग्रेस हा दंगेखोरांना समर्थन करणारा पक्ष - साध्वी प्रज्ञा