नांदेड - टाळेबंदीच्या काळात हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांसाठी आणि रस्त्यावरील निराधार, गरजू व भिक्षेकरुंसाठी अनेक सेवाभावी संस्था आणि सामाजिक संघटनांनी अन्नदान करुन त्यांना दिलासा दिला होता. परंतु, 12 जुलैच्या मध्यरात्रीपासून लावण्यात आलेल्या संचारबंदीचे परिणाम आज चौथ्या दिवशी शहराच्या विविध भागात दिसून येत आहेत. रस्त्यावर असणारे निराधार गरजू, भिक्षेकरी अन्नासाठी आग्रह करीत आहेत. या भिक्षेकरुंची व्यथा पाहून त्यांना जमेल ती पैशांची मदत काहीजण करत असले तरी पैसे नको अन्न द्या, अशी भावना निराधार गरजू भिक्षेकरुंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
काही भिकारी पैश्याएवजी जेवण देण्याची मागणी करत आहेत. तेव्हा संचारबंदीच्या काळात शहरातील सामाजिक संघटनांनी रस्त्यावर असलेल्या भिक्षेकरुंसाठी दोन वेळेच्या अन्नपाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
दरम्यान, महावीर चौक, शिवाजीनगर, श्रीनगर, अण्णाभाऊ साठे चौक, महाराणा प्रतापसिंह चौक, तरोडा नाका परिसर, छत्रपती चौक, आयटीआय, सिडको, लातूर फाटा या परिसरात भिक्षेकरुंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सर्व व्यवहार सुरळीत असताना रस्त्यावर फिरून पोट भरणाऱ्या भिक्षेकरुंना अनेकजण मदत करतात. पण, संचारबंदी लागून आजचा तिसरा दिवस असल्याने या भिक्षेकरुंना अन्नाची मदत करणे गरजेचे झाले आहे.