नांदेड ( किनवट) : कमठाला शिव लोणी तलावाच्या कालव्याला लागून व जंगला लगतच्या घोटी शिवारातील अनिल कदम यांच्या शेतातील विहिरीत २९ जानेवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास अस्वल पडले. नरमादी दोन अस्वल शेतात आले होते. त्यातील एक अस्वल विहिरीत पडले. याबाबतची माहिती किनवटचे वनक्षेत्रपाल प्रमोद राठोड यांना मिळाली. त्यांनी विदर्भातील उमरखेड तालुक्याच्या वनक्षेत्र वन्यजीव विभागाचे क्षेत्रपाल आटपाडकर व त्यांची टीम आणि किनवट वन परिक्षेत्राचे वनपाल जी. टी. माझळकर, एम. एन. कतुलवार, वनरक्षक विकास बरले, कोमल मरस्कोल्हे, सुनीता पडवाळे, मुकद डोईफोडे, कुलदीप मुळे, जी. एन. कापसे यांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन अस्वलाला विहिरी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
वनविभागाच्या पथकाला आले यश : अखेर दुपारी पावणेतीन वाजता अस्वलाला रेस्क्यू करण्यात वनविभागाच्या पथकाला यश मिळाले आहे. किनवट तालुक्यातील जंगला लगतच्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा हौदोस सतत सहन करावा लागत आहे. पिकांची नासाडी व वन्य प्राण्यांचे हल्ले याला शेतकरी व सालगडी यांना तोंड द्यावे लागत आहे. रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जावे लागत आहे. कारण कृषी पंपांना,रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात आहे. परिसरात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत आहे. तर आता जंगला भोवती जाळीचे कुंपण करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
पिंजरा सोडून काढले बाहेर : अस्वलाला जेसीबीच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडून पिंजऱ्याच्या गेटची दोरी हातात घेवून तब्बल सहा तासानंतर अस्वल बाहेर आले. तर किनवटचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू करत पिंजयात अस्वल बंद केले. हे अस्वल वन्यजीव क्षेत्रात सोडण्यात येणार आहे. अस्वलाला पाहण्यासाठी अंबाडी, घोटी व कमठाला येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मटणाच्या दुकानात अस्वलाचा धुमाकुळ : या आधीही उत्तराखंडमध्ये अशीच घटना घडली होती. बिबट्यापासून अजूनही लोकांची सुटका होऊ शकलेली नाही, तर दुसरीकडे अस्वलानेही दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. आग्रोडा शहरात अस्वलाची दहशत निर्माण झाली आहे. भल्या पहाटे मटणाच्या दुकानाला अस्वल धुमाकुळ घालत होता. तिथल्या कोंबड्या आणि मासे यांना तो आपला चरक बनवत होता. त्याचबरोबर अस्वलाच्या दहशतीमुळे लोक घाबरले आहेत. वनविभागाने अस्वलाच्या दहशतीतून लवकर सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा : Nanded News तलाव नको म्हणून अख्खे गावच बसले उपोषणाला चूल बंद आंदोलन