नांदेड - सभापतीपदाचे आरक्षण खुल्या गटातील महिलांसाठी सुटले असताना ओबीसी (इतर मागासवर्ग) गणातून निवडून आलेल्या महिला सदस्याला काँगेसने संधी दिल्याने, या पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या शुभलक्ष्मी सूर्यवंशी यांची संधी हुकली. त्यामुळे त्यांचे पती बालाजी सूर्यवंशी हे भावूक होऊन रडू लागल्याचे चित्र नांदेड पंचायत समितीत सोमवारी (दि. 6 जाने.) पहावयास मिळाले.
विधानसभा निवडणुकीत उत्तर मतदारसंघातून पती बालाजी सूर्यवंशी यांनी उमेदवारी मागितल्याने माजी आमदार डी.पी. सावंत यांनी मला सभापती पदापासून डावलले असल्याचा आरोप शुभलक्ष्मी सूर्यवंशी यांनी केला. पक्षाची साथ असताना असा चुकीचा निर्णय घेण्यात आला, असेही त्या म्हणाल्या.
नांदेड पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी सुटले होते. यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते बालाजी सूर्यवंशी यांच्या पत्नी शुभलक्ष्मी सूर्यवंशी या सभापतीपदासाठी इच्छुक होत्या. पक्षीय स्तरावर त्यांनी पाठपुरावा सुद्धा केला होता. पत्नीला सभापती पद खुल्या प्रवर्गाला सुटल्याने शुभलक्ष्मी सूर्यवंशी या सभापतीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते.
हेही वाचा - धर्माबाद पंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापती निवडीवरून राडा
सभापती निवडीचा दिवस उजाडला अन फासे उलटे पडू लागले. सभापतीपद सर्वसाधारण महिला गटासाठी असतानाही काँग्रेसने ओबीसी गणातून निवडूण आलेल्या महिला सदस्याला सभापतीपदाची उमेदवारी बहाल केली. ओबीसी गणातून निवडून आलेल्या महिला सदस्या सभापतीपदावर विराजमानही झाल्या. त्यानंतर मात्र, काँग्रेस कार्यकर्ते बालाजी सूर्यवंशी भावूक झाले. विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघातून उमेदवारी मागितल्याने आमचा असा सूड उगवला गेल्याचा आरोप शुभलक्ष्मी सूर्यवंशी यांनी केला.
हेही वाचा - वृद्ध महिलेचा गळा दाबून दमदाटी करत मोलकरणीने पळवले दागिने