नांदेड - वृत्तपत्रे आणि पत्रकार हा लोकशाहीचा चौथा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. अलीकडच्या काही वर्षांत देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. त्यामुळे वृत्तपत्र आणि पत्रकार यांची गळपेची होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पत्रकारांनी आता स्वायत्त झाले पाहिजे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या द्विवार्षिक अधिवेशनाचा समारोप रविवारी मालेगाव रोडवरील भक्ती लॉन्स येथे स्व. रामेश्वरजी बियाणी नगरीमध्ये झाला, यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
आपल्या भाषणात अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले की, अलीकडच्या काही वर्षांमध्ये देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि मिडियाची गळपेची होत असल्याचे दिसून येते. वृत्तपत्र आणि पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असे आमचे मत आहे. आमच्या राजवटीमध्ये मिडियाची, वृत्तपत्रांची, पत्रकारांची गळपेची होत नव्हती, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. पत्रकारांच्या अनेक मागण्या आहेत. अनेक अडचणी आहेत. सरकारने त्या सोडवल्या आहेत. असे असले, तरीही वृत्तपत्रे आणि पत्रकार यांनी भविष्य काळात स्वायत्त झाले पाहिजे, असे आवाहन अशोकराव चव्हाण यांनी केले.
राज्याचा मुख्यमंत्री असताना, पत्रकारांच्या कल्याण निधीसाठी जे निर्णय घेता येतील ते करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सद्याचे सत्ताधारी पत्रकारांची चेष्टा करत आहेत. पेन्शन योजना असो की, हल्लाविरोधी कायद्या या सरकारची भूमिका पत्रकारांच्या बाजूची नाही. तुम्ही आमचे सरकार आणा सत्तांतर घडवा, सगळे प्रश्न मार्गी लावू असे सांगून पत्रकार संघाच्या अधिवेशनाच्या आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. स्व. सुधाकरराव डोईफोडे, ग.ना. अंबेकर, नंदकुमार देव, लक्ष्मणराव गायकवाड यासह ज्येष्ठ पत्रकारांच्या कार्याचे स्मरण केले. राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर फटकेबाजी त्यांनी केली. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचे ३७० कलम रद्द केले, तेथे लडाख व जम्मू-काश्मीर असे केंद्रशासित प्रदेश निर्माण केले, ती परिस्थिती वेगळी. परंतु राज्यातही मराठवाडा, विदर्भ व मुंबईसह उर्वरित महाराष्ट्र असे त्रिस्तरीय विभाजन करण्याचा संभाव्य धोका राज्याला आहे. परंतु, आम्ही अखंड महाराष्ट्र राज्याचे पुरस्कर्ते आहोत. असे विभाजन कदापी होऊ देणार नाही असे त्यांनी सांगितले.
आ. विक्रम काळे यांनी तुमची साथ राहू द्या. येत्या काळात निश्चितच अशोकराव या राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे भाष्य करत आजच्या सोशल मिडीयाच्या युगातही प्रिंट मिडियाचे महत्त्व अबाधित आहे. पत्रकारांच्या पेन्शन व इतर महत्त्वाचे प्रश्न विधान परिषदेत मांडू, असे आ. काळे यांनी यावेळी आश्वासित केले. परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी अशोकराव चव्हाण हे पत्रकारांचे मित्र आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी पत्रकारांच्या कल्याणाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. शेतकरी व पत्रकारांची सध्या सारखीच अवस्था असून, हे सरकार पेन्शन योजना लागू करते व जाचक अटी लावून पत्रकारांची क्रूर चेष्टा करत आहे, असे सांगून राज्यव्यापी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या-त्या जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येणार असल्याचे एस. एम. यांनी जाहीर केले.
पत्रकार परिषदेचे नूतन अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांचे भाषण झाले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर यांनी केले. परिषदेचे नूतन अध्यक्ष , सरचिटणीस, जिल्हा पत्रकार संघ, विविध पदाधिकारी तसेच आयोजकांतील प्रमुख पत्रकारांचा गौरव राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्व. सुधाकरराव डोईफोडे व्यासपीठावर राज्याचे माजी मंत्री आ.डी.पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, शिक्षक आ. विक्रम काळे, परिषदेचे विश्वस्त एस. एम. जोशी, महापौर दीक्षा धबाले, अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, माजी आ. गजानन नाईक, दिलीप सपाटे, विनोद जगदाळे, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, संपादक राम शेवडीकर यासह मान्यवरांची उपस्थिती होती.