नांदेड - जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. या दोन्ही दिवशी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. मात्र, मी कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी संदर्भात अर्ज केला नाही. पण, पक्षाने आदेश दिला तरच निवडणूक लढवेन, अन्यथा नाही, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे या मागे चव्हाण यांचा काय हेतू आहे ? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या इच्छुकांनी शक्तीप्रदर्शनासह पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. या 2 दिवसात पक्ष निरीक्षकासह अशोक चव्हाण या मुलाखतीवेळी पूर्णवेळ उपस्थित होते. तसेच आज भोकर मतदारसंघातील इच्छुक उमेदवारी साठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. मात्र, अशोक चव्हाण यांनी निवडणुकीसाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज पक्षाकडे केला नाही.
यावेळी अशोक चव्हाणांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना, मी भोकरमधून विधानसभेचा उमेदवार म्हणून इच्छुक नाही. पक्षाने आदेश दिल्यास आपण विधानसभेच्या मैदानात उतरू आणि पक्षाच्या उमेदवारी संदर्भात पक्षाची तांत्रिक प्रक्रीया पूर्ण करू असे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतही सुरुवातीच्या टप्प्यात अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण या निवडणूक लढविणार, असे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी खुद्द अशोक चव्हाणच मैदानात उतरले. आताही काही तरी राजकीय गुगली असल्याची चर्चा आहे.