नांदेड - सचखंड गुरुद्वारा परिसरात पोलिसांवर झालेला हल्ला हा निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया पालक मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली आहे. पोलिस गुन्हेगारांचा तपास करत असून गुन्हेगारावर पोलिस कारवाई करतील अशी आशा चव्हाण यांनी व्यक्त केली.
हल्ला महल्ला कार्यक्रमा दरम्यान झाला होता वाद -
शीख धर्मियांचा पारंपरिक पद्धतीने होत असलेला हल्ला महल्ला कार्यक्रमाला लॉकडाऊनमुळे निर्बंध आणले होते. गुरुद्वाराबोर्डा कडून देखील हल्ला महल्ला कार्यक्रम पार पडणार नाही असे सांगण्यात आले होते. गुरुद्वाऱ्याच्या आत धार्मिक विधी पार पाडून हा सण साजरा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र,काही अती उत्साही तरुणांनी अचानकपणे हल्ला महल्ला काढला. यावरून पोलीस आणि शीख तरुणांमध्ये वाद झाला होता.
अनेक अधिकारी आणि कर्मचारी जखमी -
हल्ला महल्ला कार्यक्रमा दरम्यान अचानक पणे गुरुद्वाऱ्या बाहेर जमाव आला. त्यामुळे एकच तारांबळ उडाली होती. हल्ला महल्ला कार्यक्रम होणार नाही असे आश्वासन गुरुद्वारा बोर्डाकडून देण्यात आले होते. मात्र, जमाव अचानकपणे गुरुद्वाऱ्या बाहेर पडला. बाहेर लावण्यात आलेले बॅरिकेट्स तोडत या जमावाने गोंधळ घातला. काही अतीउत्साही तरुणांनी थेट पोलिसांवर हल्ला करून पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. यात पोलीस अधीक्षकाच्या अंगरक्षकासह चार पोलीस जखमी झाले आहेत. या घटने बाबद अशोक चव्हाण यांनी आज आढावा घेतला.
ही घटना दुर्दैवी-
धुलिवंदनाच्या दिवशी पोलिसांवर झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे. ज्यांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला त्या लोकांचा तपास सुरू आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली. कोरोना संसर्गामुळे हल्लाबोल मिरवणूक काढण्यात येणार नाही अशी ग्वाही बाबाजींनी दिली होती. किंबहूना त्यांनी जबाबदारी घेतली होती. मात्र, जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे, तो घडायला नको होता. या प्रकरणी आपण जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या संपर्कात होतो असे त्यांनी सांगितले. नांदेडमध्ये शांतता अपेक्षित आहे. नागरिकांनी प्रशासनाला शांततेसाठी सहकार्य करावे. सोमवारी रात्री पोलिसांवर हल्ला झाला शेवटी ते देखील माणूस आहेत. केलेला हल्ला हा दुर्दैवी आहे. पोलिस योग्य तपास करत असून काहीजणांना ताब्यात घेतले आहे. तलवारीने हल्ला केलेल्या आरोपीला पोलिस सोडणार नाहीत असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.