नांदेड - यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना उलटला. या कालावधीत भोकर विधानसभा मतदारसंघात वार्षिक सरासरीच्या केवळ १५ टक्के पाऊस झाला. त्यामुळे या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध नाही. दुबार आणि तिबार पेरणीचे नवे संकट शेतकर्यांपुढे उभे आहे. अशा वेळी दुष्काळाच्या सुरू असलेल्या उपाय योजनांच्या कालावधीमध्ये वाढ करुन सप्टेंबर महिन्याच्या नजर आणेवारीची वाट न पाहता दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भोकरच्या आमदार अमिता चव्हाण यांनी एका लेखी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.
या संदर्भात आमदार चव्हाण यांनी एका शिष्टमंडळासमवेत जिल्हाधिकार्यांची भेट घेवून उपरोक्त मागणी केली. जिल्हधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ९९६, मुदखेड तालुक्याचे ८५३ तर अर्धापूर तालुक्याचे ८६९ इतके आहे. या तीन्ही तालुक्यात अनुक्रमे १५.१० टक्के, २४.९५ टक्के व १६ टक्के इतका अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे भोकर विधानसभा मतदारसंघात विशेषतः भोकर तालुक्यात अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. जनावरांना पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध नाही. शेतकर्यांनी दुबार आणि तिबार पेरणी करुन सुध्दा पिकांची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे.
डिसेंबर २०१८ मध्ये तालुकानिहाय टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला. त्याची वास्तवात अंमलबजावणी करण्यात आली नाही. शेतकर्यांना पिककर्ज देण्यासाठी बँका टाळाटाळ करीत आहेत. अशा वेळेस दुष्काळ जाहीर करण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या नजर आणेवारीची वाट न पाहता भोकर विधानसभा मतदारसंघात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. पशुधन वाचविण्यासाठी पशुपालकांना चारा उपलब्ध करुन द्यावा, गावकर्यांच्या मागणीनुसार टँकर उपलब्ध करुन द्यावेत, दुबार आणि तिबार पेरणी करुन अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांच्या पिकांचे जायमोक्यावर जावून तात्काळ पंचनामे करावेत, व शेतकर्यांना हेक्टरी २५ हजारांची आर्थिक मदत करावी अशी मागणी आ.सौ.अमिताताई चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकार्यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, भोकर बाजार समितीचे सभापती जगदीश पा.भोसीकर, जि.प.तील काँग्रेसचे गटनेते प्रकाश देशमुख भोसीकर, थेरबनचे सरपंच रामचंद्र मुसळे यांचा समावेश होता.