नांदेड - केंद्र सरकारने जून महिन्यातच धार्मिक स्थळांना लॉकडाऊनमधून वगळण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारने अद्यापपर्यंत धार्मिक स्थळे उघडण्यासाठी परवानगी दिलेली नाही. तरी सर्व धर्मिय धार्मिक स्थळे सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सर्व धर्मिय समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. यासाठी समितीच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जागतिक स्तरावर नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारा प्रसिद्ध आहे. यात्रेकरुंच्या येण्यामुळे बहुतांश व्यवसाय अवलंबून आहेत. महाराष्ट्र सरकारने दारु, गुटखा, मॉल या सारख्या व्यावसायिकांना परवानगी दिली आहे. वास्तविक ही सर्व ठिकाणे गर्दीची आहेत.
सामान्य लोकांसाठी राज्यातील सर्व धार्मिकस्थळे खुली करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनावर कृष्णगुरु बेरळीकर, सोमेशगुरु दांडेगावकर, महेंद्रसिंघ पैदल, सतपालसिंघ लांगरी, खालेद शाकेरसाहब, मौलाना अजिम रिजवी, भन्तेजी पय्याबोधी, टीएम जॉर्ज, सुहास पुजारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.