नांदेड - पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी विविध पर्यायांचा शोध घेत आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील शेलगाव (ता. अर्धापूर) येथील कृषी पदवीधर शेतकरी हनुमंत राजेगोरे यांनी सीताफळ लागवडीचा पर्याय निवडला आहे. या फळाच्या विक्रीसाठी ते व्हॉटसअॅप ग्रुप, फेसबुक या सारख्या सामाजिक माध्यमांचा वापर करून जाहिरात व मार्केटिंग करत आहेत. त्यामुळे, त्यांच्या शेतातील सीताफळाची मागणी वाढली आहे.
राजेगोरे यांचे नांदुसा येथे शेत असून ते नांदेड शहराजवळ आहे. त्यामुळे, अनेक ग्राहक थेट त्यांच्या शेतातून सीताफळ खरेदी करत आहेत. मागणी वाढत असल्याने राजेगोरे यांनी आता सीताफळाची बॉक्स पॅकिंग करून त्यास बाजारपेठांमध्ये विक्री करण्याचे ठरवले आहे. कमी सिंचन, माफक उत्पादन खर्च आणि तुलनेने शाश्वत उत्पादन यामुळे हनुमंतराव राजेगोरे यांनी सिताफळाच्या क्षेत्रात टप्प्या टप्प्याने वाढ केली आहे.
उत्पादन व लागवडी खर्च
रोपांच्या किमतीसह लागवडीचा खर्च प्रतिरोप साधारणपणे १०० रुपये इतका येतो. सीताफळ बागेत आंतर पिकाची लागवड केली जाते. त्यासाठी केलेली मशागत, खत व्यवस्थापनाचा बागेला फायदा होतो. वेगळे व्यवस्थापन करावे लागत नाही. पहिली दोन वर्षे शेडा छाटणी करावी लागते. बागेमध्ये फुलोऱ्यानंतर ५ ते ६ फवारण्या कराव्या लागतात. त्यासाठी एकरी ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. बेसल डोससह ठिबक, विदाका खातांचा एकरी एकूण खर्च २० हजार रुपये होतो. फळबागेसह अन्य शेतीमध्ये काम करण्यासाठी तीन मजूर आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येकी ८० हजार रुपये प्रतिवर्ष मजुरी दिली जाते.
शिवारातूनच होते विक्री...
२०१६ मध्ये सीताफळाचे उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला नांदेड येथील मार्केटमध्ये स्वतः नेऊन विक्री केली. पहिल्या वर्षी मिळालेल्या १० क्विंटल उत्पादनाला सरासरी ८० रूपये प्रतिकिलो असा दर मिळाला. दुसऱ्या वर्षीपासून व्यापारी शेतातून सीताफळाची खरेदी करू लागले. २०१७ मध्ये १४ क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला प्रतिकिलो सरासरी १०० रुपये दर मिळाला. २०१८ मध्ये ३० क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला प्रतिकिलो सरासरी ११० रुपये दर मिळाला. गतवर्षी सरासरी १२५ रुपये प्रतिकिलो असा चांगला दर मिळाला. यंदाही अतिपावसामध्ये चांगले उत्पादन येणे अपेक्षित आहे, असे राजेगोरे यांनी सांगितले.
विक्रीसाठी सामाजिक माध्यमांचा वापर
विक्रीसाठी व्हॉटसअॅप ग्रुप, फेसबुक यासारख्या सामाजिक माध्यमांचा वापर करतो. नांदुसा हे गाव नांदेड शहराजवळ असल्याने अनेक ग्राहक शेतातून ताजी सीताफळे खरेदी करतात. आठ एकर पैकी तीन एकर क्षेत्रावरील माल काढणीस सुरुवात झाली असून सात ते आठ टन उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. यावर्षी 80 ते 90 रुपये प्रतिकिलो दर मिळत असून सहा ते सात लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षीत आहे, असे राजेगोरे यांनी सांगितले.
टप्प्या टप्प्याने वाढवले क्षेत्र
कमी सिंचन, माफक उत्पादन खर्च आणि तुलनेने शाश्वत उत्पादन यामुळे हनुमंतरावांनी सीताफळाच्या क्षेत्रात टप्प्या टप्प्याने वाढ केली. २०१७ मध्ये सीताफळाची ३ एकर १० गुंठे क्षेत्रावर १ हजार १०० झाडांची लागवड केली. गेली दोन वर्षे या पिकामध्ये सोयाबीन व हळदीचे आंतर पीक घेतले. सोयाबीननंतर रब्बीमध्ये हरभऱ्याचे उत्पादन घेतले. आत्मविश्वास वाढल्याने २०१९ मध्ये आणखी ३ एकर २० गुंठे क्षेत्रावर सीताफळ लागवड केली. त्यांच्याकडील सीताफळाचे क्षेत्र ८ एकरांवर पोहोचले आहे.
गावरान सीताफळाचा हंगाम संपल्यानंतर बाजरात विक्री
बागेत कामगंध सापळे लावली आहेत. सोबतच रान तुळशीची लागवडही केली आहे. ढगाळ वातावरणाचा फळांच्या उत्पादनावर परिणाम होते. सीताफळाचा काढणी हंगाम दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये असतो. आम्ही साधारणपणे गावरान सिताफळचा हंगाम संपल्यानंतर बागेची छाटणी करून विक्रीचे नियोजन करतो. सीताफळाची तोडणी केल्यानंतर क्रेटमध्ये भरून ते विक्रीस पाठवले जातात. एलएमके १ या वाणाची सीताफळे हिरव्या, पिवळसर रंगाची असून, कवच तुलनेने टणक असते. परिपक्व काढणीनंतर फळ पाच सहा दिवस टिकून राहते. गावरान वाणाच्या तुलनेत गराचे प्रमाणही अधिक असल्याने ग्राहकांची अधिक पसंती मिळते.
हेही वाचा- नांदेड जिल्ह्यात चैत्यन्यमय वातावरणात लक्ष्मीपूजन; फटाक्यांची आतिषबाजी....!