नांदेड - मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांनी घेषणाबाजी केली. विजय वडेट्टीवार हे नांदेड दौऱ्यावर आले आहेत. मुखेड तालुक्यातील सलगरा शिवारात त्यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी केवळ पाहणी न करता मदत करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
रविवारी मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार नांदेड दौऱ्यावर आले होते. नांदेड येथे अधिकाऱ्यांसोबतची बैठक संपवून ते मुखेडकडे पाहणी दौऱ्याकडे गेले. तालुक्यातील सलगरा गावातील शेतीची त्यांनी पाहणी केली. दरम्यान पाहणी दौरे बंद करा, मदतमंत्री मदत करा, अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या.
अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मूग, उडीद, सोयाबीनसह कापसाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अधिकारी आणि पदाधिकारी या नुकसानीची पाहणी करून जातात मात्र मदत मात्र मिळत नाहीये. यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. आता पाहणी दौरे बंद करा आणि थेट मदत करा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.