नांदेड- पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला असताना मराठवाड्य़ातील जायकवाडी सोडता सर्व धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. नांदेडमधील विष्णूपुरी धरण केवळ 19 टक्के भरले आहे. परभणी जिल्ह्यात फारसा पाऊस झाला नसल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प भरण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. मात्र, जायकवाडी धरण आज 82.97 टक्के भरले असल्याने धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडीचे पाणी विष्णूपुरीत येण्याची शक्यता बळावली आहे.
नांदेड जवळच्या आमदुरा बंधाऱ्यात ८०.१३ टक्के ( १८ . ५९ दलघमी ) तर बळेगाव बंधाऱ्यात ६९ . ३० टक्के ( २८ . २६ दलघमी ) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे . शनिवारी सकाळी आठ वाजता प्राप्त आकडेवारीनुसार इसापूर धरणात १४.२३ टक्के ( १३३ . २५ दलघमी ) तर निम्न मानार प्रकल्पात २० . ६३ टक्के ( २८ . ५१ दलघमी ) पाणीसाठा उपलब्ध आहे . जायकवाडी प्रकल्पात ८२. ६५ टक्के ( १६२० . ५४ दलघमी ) तर विष्णूपुरी प्रकल्पात १९.९१ टक्के ( १५ . ४७ दलघमी ) पाणीसाठा उपलब्ध आहे . तेलंगणातील श्रीराम सागर, पोचमपाड धरणात १६. २३ टक्के ( ४१४ . ९७ दलघमी ) पाणीसाठा उपलब्ध आहे .
पश्चिम महाराष्ट्रात महापुराने थैमान घातले असताना मराठवाडा मात्र पाण्याच्याबाबतीत समाधानी नाही. जमिनीत मुरण्याइतके व पिकांना तरण्याइतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये समाधानकारक साठा उपलब्ध नाही. माजलगाव प्रकल्पात पाणी साठा नसल्यामुळे तेथील लोकप्रतिनिधींनी जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. ढालेगाव, येलदरी, सिद्धेश्वर, मुद्गल, मुळी, दिग्रस, अंतेश्वर या बंधाऱ्यातही पाणी साठा उपलब्ध नसल्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडण्याची आवश्यकता होती. त्यामुळे जायकवाडीचा एक दरवाजा उघडण्याची चिन्हे आहेत.