नांदेड - शहरात बुधवारी (ता. 20) पुन्हा नव्या चार कोरोना रुग्णांची भर पडली आहे. शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 110वर पोहोचली आहे. बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात चार जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात सांगवी अंबानगर येथील कंटेन्मेंट झोनमधील एक, भोकरमध्ये एक, मुखेडमध्ये एक तर नांदेड शहरातील अन्य नगरातील एकाचा समावेश आहे .
कोरोनामुक्त झालेल्या सहा रुग्णांना घरी सोडल्यानंतर नांदेडकरांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र, सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानंतर नांदेडकरांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. शहरात बुधवारी पुन्हा नव्या चार कोरोना रुग्णांची भर पडली असून नांदेड शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 110वर पोहोचली आहे.
देशभरात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत असताना नांदेड तब्बल 30 दिवस कोरोनामुक्त होते. ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या नांदेडमध्ये एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आणि बघता बघता 20-22 दिवसांत नांदेडमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येने शतक पार केले. नागरिकांनी सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी केले आहे.