नांदेड - येथील नांदेड - हैदराबाद महामार्गावरील नेकलेस रस्त्यानजीक स्थानिक गुन्हा शाखेने गुटखा भरलेला एक ट्रक पकडला आहे. शनिवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास हा ट्रक पकडण्यात आला. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना प्राप्त माहितीनुसार, या ट्रकसह पकडलेल्या मुद्देमालाची किंमत 25 लाख 36 हजार रुपये आहे.
संजय जाधव यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारवर त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेने गुटखा पकडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. स्थानिक गुन्हा शाखेचे पथक नेकलेस रस्त्यानजीक पोहचले होते. तेव्हा रात्री १ वाजेच्या सुमारास त्यांना ट्रक क्रमांक एम एच ३१ जी ६५९९ दिसला. त्याला थांबवून तपासणी केली असता त्यात अनेक प्रकारचे प्रतिबंधित गुटख्याचे थैले भरलेले आढळले. अधिक तपासणी केल्यानंतर एकूण 30 थैल्यांमध्ये गुटखा भरलेला होता.
पोलिसांची चाहूल लागताच ट्रक चालकासह सर्वजण पळून गेले आहेत. हा गुटखा कोणी कोणासाठी पाठवला आहे हे शोधण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. याबाबत अन्न व सुरक्षा विभागाचे निरीक्षक उमेश रामराव कावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक आणि गुटखा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केला आहे.
यासर्व ऐवजाची किंमत 25 लाख 36 हजार रुपये असल्याची नोंद पोलीस प्राथमिकीमध्ये करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी प्रतिबंधित गुटखा पकडणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक केले आहे.