नांदेड - लॉकडाऊनमुळे नांदेडमध्ये टोमॅटोला सध्या बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे हणेगाव (ता.देगलूर) येथील शेतकऱ्याने तब्बल 23 एकर शेतातील टोमॅटो अक्षरशः फेकून दिला आहे. शेतकऱ्याला उत्पन्न तर नाहीच, उलट टोमॅटोच्या उत्पादनासाठी खर्च केलेले लाखो रूपये पाण्यात गेले आहेत.
देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील संदीप पोकलवार या शेतकऱ्याने लाखो रुपये खर्च करत टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, टाळेबंदीमुळे टोमॅटोला बाजारात किलोला 2 ते 3 रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे पोकलवार यांनी टोमॅटोची बाग उपटली आणि टोमॅटो फेकून दिले आहेत.
तब्बल २५ ते ३० लाख रुपये केले होते खर्च!
रान तयार करणे मल्चिंगसह ३ लाख २० हजार खर्च झाला, टोमॅटो आणि शेवगा रोपे खरेदीसाठी ७ लाख रुपये, खत आणि कीटकनाशके ४ लाख ७० हजार रुपये, वेळूचे बांबू आणि तारेने बांधणी करण्यासाठी ६ लाख २३ हजार रुपये, एफएमसी बेनिविया फॉग २ लाख रुपये खर्च, विक्री नसल्याने सडलेला टोमॅटो बाहेर काढण्यासाठी २ लाख रुपये. डिसेंबर-जानेवारीमध्ये २३ एकरमध्ये तब्बल २५ ते ३० लाख रुपये खर्च करून टोमॅटोमध्ये शेवगा आंतरपीक म्हणून लागवड केली.
ऐन काढणीच्या तोंडावर आलेले टोमॅटो कोरोनामुळे सर्वत्र बाजारपेठ व वाहतूक सेवा ठप्प असल्यामुळे शेतातच सडून गेला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला वर्गाला देखील पीकविमा योजनेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी शेतकरी संदीप पोकलवार यांनी सरकारकडे केली आहे.