नागपूर Nana Patole : नागपुरात युवा काँग्रेसनं केंद्र सरकार तसंच राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थित आहेत. दरम्यान, नाना पटोले यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती.
पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर कारवाई करा : या मोर्चात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तरुणांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. यात ऑनलाईन पेपरफुट, महागाई, बेरोजगारी असे विविध विषय घेण्यात आले होते. हा मोर्चा केंद्र सरकार तसं राज्य सरकाच्या विरोधात काढण्यात आला. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं सरकारचं दुर्लक्ष : यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, काँग्रेस तरुणांना न्याय मिळवून देणार आहे. हे फडणवीस सरकारचं पाप आहे. या राज्यातील तरुण-तरुणींच्या बेरोजगारीचा प्रश्न आम्ही सभागृहात, रस्त्यावर मांडणार आहे, असंही पटोले म्हणाले. "महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं सरकार दुर्लक्ष करतंय. सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे," असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले पोलिसांच्या ताब्यात : दुष्काळ,बेरोजगार कंत्राटी भरतीसह अनेक विषयाला धरून युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात युवक कॉंग्रेससह अनेक नेते सहभागी झाले होते. अंजुमन अभियांत्रिकी विद्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलनकर्ते हे लिबर्टी चौकात आल्यानंतर मोर्चा पॉईंटवर पोलिसानी त्यांचा मोर्चा अडवला. त्यामुळं कार्यकर्ते आक्रमक झाले. आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेट्सवर चढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अतुल लोंढे, सुनील केदार यांना ताब्यात घेतलं.
हेही वाचा -