नागपूर- शहरातील आकाशवाणी चौकात असलेल्या भल्या मोठ्या हायमास टॉवर वर एक बेरोजगार तरुण शनिवारी रात्री उशिरा चढला होता. मनोज असे त्या तरुणाचे नाव आहे. तो आत्महत्या करण्याच्या उद्देशाने टॉवर वर चढला होता. घटनेची माहिती समजताच पोलिसांचा ताफा त्याठिकाणी दाखल झाला. पोलिसांनी चार तास समजावल्यानंतर अग्निशमन विभागाने त्याला खाली आणले. या ठिकाणी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
तरुण टॉवरवर चढला असल्याचे लक्षात येताच येथे लोकांची गर्दी जमा झाली. सर्वांनी त्याची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तो कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. कुणी वर येण्याचा प्रयत्न केला तर गळफास घेईल, ब्लेड ने हात कापेल, अशा धमक्या तो देत असल्याने सुमारे चार तास हे संपूर्ण नाट्य रंगले होते. अखेर अग्निशमन विभागाच्या पथकाने त्याला सुखरूप खाली उतरावताच पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आत्महत्या करण्यासाठी टॉवरवर चढलेला मनोज हा उच्चशिक्षित आहे. कौटुंबिक वाद आणि काम धंदा नसल्याने वाढत असलेल्या कर्जामुळे तो आत्महत्येच्या विचाराने टॉवरवर चढल्याचे सांगण्यात येत आहे. तो आधी टॉवरच्याच कंपनीत अभियंता असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तो सध्या बेरोजगार असल्याची माहिती आहे. मनोज कुठल्याही क्षणी टॉवर वरून उडी मारेल या भीतीने पोलिसांनी टॉवरच्या सभोवताल जाळी लावली होती,अखेर चार तासानंतर त्याची समजूत काढण्यात पोलिसांना यश आल्यानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाने त्याला खाली उतरवले आहे.