नागपूर - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांकरिता देशपातळीवरून मदतीचा ओघ वाढलेला आहे. त्यामध्ये सामान्य जनतेत सोबतच सिनेकलाकार क्रिकेट खेळाडू यासह विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या मान्यवरांनी मदत देऊ केली आहे. शहरात राहणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टर वैशाली अटलोए यांनीदेखील सैन्यातील जवान व त्यांच्या कुटुंबीयांना आजन्म उपचार नि:शुल्क देऊ केलेला आहे. त्यांच्या या उपक्रमाची शहरात चर्चा असून या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक होत आहे.
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात देशाचे ४० पेक्षा जास्त जवानांना वीरमरण आले होते. देशाच्या सुरक्षेसाठी प्राणाचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांसह प्रत्येक देशवासीयांच्या मनावर मोठा आघात झालेला आहे. वेळेनुसार या हल्ल्याच्या आठवणी धुसर होतील; पण जखमा आजन्म ताज्या राहणार आहेत. या हल्ल्यात देशाचे ४० जवान हुतात्मा झालेले असून त्या जवानांच्या कुटुंबियांवरही मोठे संकट कोसळलेले आहे. अशा परिस्थितीत समाजाने हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. समाजाने आधार दिल्यास सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांचे दुःख विसरायला काही अंशी का होईना, मदत होणार आहे.
नागपूरच्या प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ. वैशाली अटलोए यांनी त्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सैन्यातील जवानांसाठी व त्यांच्या कुटुंबासह हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना आजन्म उपचार मोफत देऊ केलेला आहे. जवानांनी कुठल्याही प्रकारचे शुल्क देऊ नये. कारण त्यांनी रुग्णालयाच्या शुल्कापेक्षा ही कितीतरी जास्त शुल्क सेवेकरिता मोजलेला आहे. सीमेवर लढताना देखील आपल्या जीवाची बाजी लावत आपले जवान प्राणाचे सर्वोच्च बलिदान देत असतात. तेव्हा अशा जवानांसाठी शुल्क माफ करणे, हा अगदी छोटासा प्रयत्न असल्याचे मत डॉ. वैशाली यांनी व्यक्त केला आहे.
एवढेच नाही तर देशाच्या कुठल्याही भागातील सैनिकांना निशुल्क उपचार देण्याची तयारी डॉक्टर वैशाली यांनी दाखवली आहे. जवानांच्या व त्यांच्या कुटुंबियांना नागपुरात येणे शक्य नसेल तर त्यांनी इंटरनेटवरून त्रिशा आयुर्वेदिक हॉस्पिटलचा पत्ता घेऊन किंवा फोन नंबर घेऊन संपर्क केल्यास फोनवरून देखील त्यांना उपचार उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक माणसाने सैन्यात असलेल्या जवानांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि हुतात्मा जवानांच्या परिवारा करिता काहीतरी देणे लागतो, याचे भान ठेवून सढळ हाताने मदत केली पाहिजे, असे आवाहन यावेळी डॉ. वैशाली यांनी केले.