नागपूर - मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असताना आता मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे ही मागणी जोर धरत आहे. यामुळे राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि मराठा समाजाचे नेते खासदार संभाजीराजे भोसले यांच्यात शाब्दिक खटके उडत आहेत. वडेट्टीवार यांनी खासगीत बोलताना मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ केल्याचा दावा संभाजीराजे यांनी केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी संभाजीराजे यांच्यावरच जे बोललो त्याचा विपर्यास केल्याचा आरोप केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता दोन समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्यानंतर मधला मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला असताना मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावे याबाबत दबक्या आवाजात मागणी सुरू आहे. याबाबत राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी खासगीत बोलताना मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ केल्याचा दावा संभाजीराजे यांनी केला. यावर विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिउत्तर दिले आहे. मी खासगी किंवा कुठेही मराठासमाजाला ओबीसीमध्ये घ्या, असे बोललो नसल्याचा दावा केला आहे.
तुम्हाला ओबीसीमध्ये यायचे असेल तर 12 टक्के आरक्षणाचा स्वतंत्र संवर्ग तयार करून सहभागी व्हावे, असेही वडेट्टीवार म्हणाले. मी ओबीसी समाजाचा आवाज बुलंद करण्याचे काम करत असल्याने मला राजकीयदृष्ट्या हलाल करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. ओबीसी समाजच्या मनात माझ्या विषयी गरसमज निर्माण करून माझा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि छत्रपती संभाजीराजे हे देखील भाजपचे खासदार आहेत. त्यांनी हा विषय केंद्रातून सोडवून आणावा असा, सल्ला वडेट्टीवार यांनी संभाजीराजे यांना दिला आहे.
हेही वाचा - नागपूरमधून 'पॉझिटिव्ह' बातमी.. ९३ वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात