नागपूर : राजेंद्र झाडे हे गेल्यावेळी दुसऱ्या स्थानी राहिले होते. त्यामुळे मतांची मोठी सांख्य त्यांच्या पाठीशी आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना महाविकास आघाडीचे समर्थन मिळेल अशी आशा होती. मात्र, काँग्रेसने यावेळी सुधाकर आडबालेंवर डाव लावला आहे. शिक्षक मतदार संघाची ही निवडणूक आता शिक्षकांच्या हिताकरिता राहिलेली नसून राजकीय आखाड्यात रुपांतरित झाली असल्याचा आरोप राजेंद्र झाडे यांनी केला आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक : सहा जिल्ह्यात एकूण 39 हजार 600 शिक्षक मतदार आहेत. त्यामध्ये 16 हजार 702 महिला तर 22 हजार 704 पुरुष मतदारांचा समावेश आहे. मतदान सुरू झाल्यापासून उमेदवारांनी मतदान केंद्रांवर जाऊन आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष समर्थित माजी आमदार नागो गाणार, महाविकास आघाडी समर्पित उमेदवार सुधाकर अडबाले आणि बाबुराव झाडे यांचा समावेश आहे.
खेळीमेळीच्या वातावरणात संवाद : सुधाकर आडबाले आणि नागो गाणार हे एकाचवेळी मेहता कॉलेजच्या मतदार केंद्रावर दाखल झाले. यावेळी दोघांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संवाद झाला. दोघांनीही यावेळी निवडणूक जिंकणार, असा दावा केलेला आहे. संपूर्ण निवडणूकीचा प्रचार जुनी पेन्शन योजनेच्या एका मुद्द्यावरच झाला आहे. मतदार आपले बहुमूल्य मतांचे दान माझ्याच पारड्यात पाडतील, मला तिसऱ्यांदा विधान परिषदेत पाठवतील, असा दावा नागो गाणार यांनी केला आहे. तर दहा वर्षात नागो गाणारांनी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे शिक्षक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. त्यामुळे यावेळी माझा विजय निश्चित असल्याचा दावा सुधाकर अडबाले यांनी केला आहे.
२७ पैकी ५ उमेदवारांची माघार : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. बंडखोरी, नाराजी नाट्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार बनली आहे. मात्र, नागपुरात राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराने माघार घेतलेली नाही. काँग्रेसकडून सुधाकर अडबाले यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता होती. तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे देखील निवडणूक रिंगणात आहेत. राजेंद्र झाडे यांना अत्यंत मजबूत प्रतिस्पर्धी मानले जात आहे. गेल्या निवडणुकीमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर होते.