नागपूर - शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने 'लसीकरण आपल्या परिसरात' ही मोहीम (सोमवार २४ मे) पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत ४५ वर्षावरील नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या संकल्पपनेतून ही योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करणे हा उद्देश आहे.
'ही मोहीम पूर्णतः नागरिकांसाठी'
'लसीकरण आपल्या परिसरात' ही मोहीम पूर्णतः नागरिकांसाठी असून, नागरिक या अभिनव मोहिमचा लाभ घेतील. यामध्ये आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे लसीकरण करून घेतील, असा विश्वासही महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. सोमवारपासून प्रत्येक लसीकरण केंद्राच्या परिसरात नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. आठवड्यातील प्रत्येक दिवशी झोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येईल. प्रत्येक केंद्राच्या परिसरात ही मोहीम राबविण्याची योजना आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.