नागपूर - केंद्र सरकारने लस उत्पादन वाढवण्यासाठी प्रत्येक राज्यात असलेल्या प्रयोग शाळांना मंजुरी द्यावी, अशा आशयाची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. काल देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी संवाद साधला होता, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. महत्वाचे म्हणजे या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये रसायन आणि खतमंत्री मनसुख मांडवीय हेदेखील उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याच्या पूर्वीच रसायन आणि खतमंत्री मनसुख मांडवीय यांनी लस उत्पादनाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे आज नितीन गडकरी यांनी एक ट्विट करत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मला याबाबत अजिबात कल्पना नव्हती की मनसुख मांडवीय यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केलेले आहे.
स्वदेशी जागरण मंचकडून कॉन्फरन्सचे आयोजन -
स्वदेशी जागरण मंचकडून आयोजित 'लसीकरण आणि औषधे' या विषयावर आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भारतातील अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंसमोर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रसायन आणि खतमंत्री मनसुख मांडवीय यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात सर्वात आधी बोलताना रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडवीय यांनी लसीकरण संदर्भांत काय उपाययोजना केल्या जात आहेत? यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर अनेक वक्त्यांची भाषण झाली.
सर्वात शेवटी नितीन गडकरी यांनी आपले विचार व्यक्त केले. तेव्हा त्यांनी मनसुख मांडवीय यांना लसीकरणाची गती वाढवण्यासाठी काही सूचना केल्या. ज्यावर मनसुख मांडवीय यांनी आधीच आपले विचार व्यक्त केले होते. यावर स्पष्टीकरण देताना आज नितीन गडकरी यांनी एक ट्विट करत सांगितले की, मला याबाबत अजिबात कल्पना नव्हती की मनसुख मांडवीय यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केलेले आहे. भारत सरकार लसीचा उत्पादन वाढवण्यासाठी १२ कंपन्यांसोबत प्रयत्न करत आहे. याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन देखील केले आहे.
हेही वाचा - नागपुरात आतापर्यंत म्युकरमायकोसिसने 26 रुग्णांचा मृत्यू, 600 जणांना बाधा