नागपूर - नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा खून झाला आहे. त्यामुळे, पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक कमी झाला की काय? असा संतप्त प्रश्न विचारण्याची वळे अली आहे. रोहित वाघमारे आणि जितू गरगणी, असे खून झालेल्या तरुणांची नावे आहेत. रोहितच्या खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र जितूचा खून कुणी आणि का केला असावा, याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - कोरोना परिस्थितीवर आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता- नितीन राऊत
पहिली घटना ही रिपब्लिकन नगरमध्ये जुन्या वैमनस्यातून घडली. आरोपी देविदास जांभूळकर आणि त्यांची दोन मुले हर्षद, भूपेंद्र आणि शैलेंद्र जांभुळकर यांनी रोहित वाघमारे आणि पियुष भैसारे नामक तरुणांचा रस्ता रोखला. आरोपींनी रोहित वाघमारे सोबत जुना वाद उखरून काढला. आरोपींनी दोन्ही तरुणांवर हल्ला केला ज्यामध्ये रोहित वाघमारे या तरुणाचा मृत्यू झाला, तर पीयूषला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती समजताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोवर रोहितचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पीयूषच्या तक्रारीवरून आरोपींना अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहितचा खून झाल्याच्या काहीच अंतर दूर असलेल्या वासनशहा नगरात खुनाची दुसरी घटना घडली. केटरिंगचे काम करणाऱ्या जितू गरगणी नामक तरुणावर धारधार शास्त्राने वार करून अज्ञात आरोपींनी त्याचा खून केला. जितूवर त्याची आई आणि दोन बहिणींची जबाबदारी होती. जितू घरचा कर्ता होता, त्यामुळे त्याची हत्या कोणी व कोणत्या कारणांनी केली, याचा तपास जरीपटका पोलीस करत आहेत.
हेही वाचा - चिंताजनक! सलग दुसऱ्या दिवशी नागपुरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूचा आकडा वाढला