नागपूर - नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ड्रस तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एनडीपीएस पथकाने शहराच्या सीमेवरील अंबाझरी ऑर्डनस फॅक्टरीच्या गेट समोर सापळा रचून कारवाई केली आहे.
भालदारपूरा येथील एक तरूण मॅफेडॉन (एम.डी.) या अमली पदार्थाची तस्करी करत असुन तो मुंबईहून हे ड्रग्स आणून नागपूरात विक्री करायचा. सय्यद सज्जाद ऊर्फ सद्दाम लियाकत अली असे त्या तरुणाचे नाव आहे. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनिल फुलारी यांना याबाबत गुप्त माहिती होती. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. तेव्हा 16 फेब्रुवारी रोजी आरोपी सय्यद सज्जाद ऊर्फ सद्दाम लियाकत अली हा विमानाने मुंबईला गेला तिथे गेल्यावर त्याने कुणालाही संशय येऊ नये म्हणू एक कार खरेदी केली होती. मुंबईतून मॅफेडॉन ड्रग्सची खेप घेतल्यानंतर तो आणि त्याचा सहकारी नागपूरला येत आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अंबाझरी ऑर्डनान्स फॅक्ट्री परिसरात सापळा रचला. त्याची गाडी दिसताच एनडीपीएसच्या पथकाने गाडी थांबवून त्यातील दोन इसमांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याजवळ 57 ग्रॅम 22 मिली ग्रॅम एम.डी. हा अमली पदार्थ आढळला आहे. यात सय्यद सज्जाद ऊर्फ सद्दाम लियाकत अली आणि विनेक दिलीप सांडेकर या दोन आरोपींना अटक केली आहे. जप्त केलेल्या एम.डी ड्रग्सची किंमत पावणे सहा लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय पोलिसांनी चार मोबाईल आणि कार देखील जप्त केली आहे.
सायबर सेलची भूमिका महत्त्वाची
पोलिसांना खात्रीशीर लिड मिळाल्याने फुलारी यांनी अमली पदार्थविरोधी पथकाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. या मोहिमेत सायबर पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करून सय्यद सज्जाद उर्फ सद्दाम लियाकत अलीवर लक्ष ठेवले. त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून अखेर पोलिसांनी अटक केली आहे.