नागपूर: नागपूर आणि भंडारा वन विभागाच्या (Forest Department) पथकाने संयुक्त कारवाई करत वाघांच्या अवयवांची तस्करी (smuggling tiger organs) करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. वन विभागाच्या गुप्तहेरांनी माहिती दिली होती, त्यानुसार हि कारवाई करण्यात आली. वन विभागाच्या पथकाने वाघांची 15 नख, 10 दात जोडी आणि हाडे अंदाजे 5 किलो सह एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई भंडारा वन विभागातील नाकडोंग्री वन परिक्षेत्रामधील गोबरवाही येथे सापळा रचून करण्यात आली आहे.
वन विभागाच्या गुप्तहेरांनी माहिती दिली होती की नाकडोंग्री वन परिक्षेत्रामधील गोबरवाही येथे वाघाच्या अवयवाची तस्करी होत आहे. वन विभागाच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून, गेल्या दोन दिवसांपासून आरोपी सोबत चर्चा सुरु ठेवली. आरोपीने वाघांच्या अवयवांच्या विक्रीची तयारी दर्शवल्यानंतर वन विभाग नागपूर आणि भंडारा वन विभाग यांची संयुक्त पथक तयार करुन सापळा रचला. आरोपी जाळ्यात अडकताचं दोन आरोपींना मुद्देमाला सह ताब्यात घेण्यात आले.
वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल: (Wildlife Protection Act) वन विभागाने आरोपी संजय पुस्तोडे आणि रामू जयदेव ऊईके या दोन आरोपींना अटक केली असून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमाद्वारे वन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.