नागपूर - चोरीचे पैसे साथीदाराला देण्याच्या वादातून तिघांनी एकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शारदा चौकात घडली. सुनील उर्फ नव्वा शेंडे असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे देशात आणि राज्यात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण घटले आहे. मात्र, उपराजधानी नागपूरमध्ये नेहमीप्रमाणे गुन्हे घडत आहेत. मृत सुनील शेंडे याच्यासोबत आरोपी संतोष येवले, अशोक गोंदुळे आणि उमेश झाडे नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी भागात राहतात. ते चौघेही चोरी करणारे असल्याने त्यांची चांगली मैत्री होती. संतोषची तब्येत बरी नसल्याने आरोपींनी त्याला खासगी रुग्णालयात नेले होते.
हेही वाचा - भीषण पाणीटंचाई; सोईसुविधा असूनही 'या' गावातील नागरिकांना 'पसापसा' पाण्यासाठी हिंडावे लागते 'रानोमाळ'
यावेळी सुनील शेंडे याने डॉक्टर आणि तिथे काम करणाऱ्यांचे लक्ष नसताना काऊंटरमधील रक्कम लंपास केली. उपचार करून घरी परत आल्यानंतर चौघांनी दारूची पार्टीदेखील केली. त्यावेळी चोरी केलेल्या पैशाची वाटणी करण्यावरून वाद सुरू झाला. तेव्हा आरोपी संतोष येवले, अशोक गोंदुळे आणि उमेश झाडे यांनी संगनमत करून सुनीलची हत्या केली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. तर पुढील तपास सुरू आहे.