नागपूर : देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी दोन ते तीनदा धमकीचे कॉल आले. धक्कादायक बाब म्हणजे धमकीची ही दुसरी वेळ असल्याचे जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच पुन्हा एकदा त्याच जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे हे कॉल आले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
त्या व्यक्तीचा शोध : त्यानंतर नागपूर पोलिसांनी केलेल्या तपासात हे निष्पन्न झाले की, हे धमकीचेच कॉल होते. धमकीचा फोन केलेल्या व्यक्तीने आपण जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी बोलत असल्याचा दावा केला असला, तरी धमकी देणारी व्यक्ती कोण आणि त्याने कुठून कॉल केले हे अजून स्पष्ट झालेले नाही. नागपूर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्याने घेऊन तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आहेत.
पोलिसांसमोर आव्हान : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आजच नागपूर दौरा असल्याने, पोलिसांसमोर आरोपींना तत्काळ शोधण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कारण केंद्रीय मंत्र्यांचा दौरा असताना हे धमकीचे कॉल येणे म्हणजे नितीन गडकरी यांच्या सुरक्षेला धोका आहे. तसेच नितीन गडकरी हे सरकारी अधिकारी, पोलिसांना नेहमीच कानपिचक्या देत असतात. वेळेत काम करण्याचा त्यांचा कटाक्ष, वेगातील कामाचा त्यांचा झपाटा यामुळे सरकारी अधिकारी आणि पोलीस यंत्रणा त्यांना दबकून असते.
निवासस्थानी सुरक्षेत वाढ : धमकीचे तीनदा फोन आल्यानंतर नितीन गडकरी यांचे नागपुरातील निवासस्थान व जनसंपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त मोठा करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी 14 जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याच्या धमकीचे तीन फोन आले होते. त्यामुळे पुन्हा धमकीचे कॉल आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांच्या निवासस्थानी आणि जनसंपर्क कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
गडकरी संध्याकाळी नागपुरात : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज संध्याकाळी नागपूरला येणार आहेत. ते संध्याकाळी जी- 20 च्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या धमकीच्या काॅलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.