नागपूर - शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बातमी आहे. जून आणि जुलै महिन्यात सामान्य पावसाची नोंद झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात सुद्धा सामान्यच पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात वरुणराजा धो-धो करून बरसत असताना विदर्भात सर्वसाधारण पाऊस झाला असल्याने अनेक जलाशय अजून पर्यंत भरलेली नाहीत, अश्या परिस्थितीत ऑगस्ट महिन्यात सामान्य पाऊस पडेल अशी भविष्यवाणी हवामान खात्याने केल्यामुळे सिंचन विभागाची चिंता देखील वाढू शकते.
विदर्भात यावर्षी मान्सूनचा निर्धारित वेळेच्या तब्बल आठ दिवस आधीच दाखल झाला होता. मात्र त्यानंतर पावसामध्ये सातत्याने नसल्याने वातावरणातील आद्रता कमी जास्त होत आहे. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात जून महिन्यात पावसाची टक्केवारी कमीच असते,त्यानंतर मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात विदर्भात दमदार पाऊस कोसळतो,मात्र या वर्षी जुलै नंतर ऑगस्ट महिन्यात सुद्धा सामान्य पावसाला अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केल्याने पावसाचा अनुशेष वाढण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या अनुषंगाने जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने पावसाळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असतात याच काळात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असते.
जुलै महिन्यातील पावसाची टक्केवारी -
संपूर्ण जुलै महिन्यात विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये ४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. नागपूर मध्ये जुलै महिन्यात १६ टक्के अधिक पाऊस झाला आहे तर अकोला जिल्ह्यात चार टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावतीमध्ये हा जुलै महिन्यातील पावसाचा आकडा १० टक्क्यांनी कमी झाला आहे. भंडारामध्ये अधिक ८ टक्के तर बुलढाणा मध्ये १३ टक्के कमी पाऊस झाल्याने तेथील शेतकरी वर्ग चिंतेत आहे. मात्र चंद्रपूरमध्ये परिस्थिती समाधान दिसून येत आहे. चंद्रपूर मध्ये २४ टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे उणे सात टक्के पाऊस कमी झाला आहे. तर गोंदिया जिल्ह्यात सुद्धा सरासरीपेक्षा १० टक्के पाऊस कमी झाला आहे. वर्धेत अधिक ८, वाशीम मध्ये अधिक १९ आणि यवतमाळ मध्ये सामान्य पेक्षा अधिक १५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात सुद्धा अश्याच प्रकारचे आकडे पुढे येण्याची शक्यता आहे.
जून महिन्यातील पावसाची टक्केवारी -
जून महिन्यात नागपूरसह विदर्भात तब्बल १९ टक्के अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाचे प्रादेशिक संचालक एम एल साहू यांनी दिली आहे. यामध्ये अमरावतीत जिल्ह्यात अधिक २५%, भंडारा अधिक ४२%, चंद्रपूर अधिक ३७% , गडचिरोली अधिक ०२% , नागपूर अधिक ३४%, वर्धा अधिक ३२%, वाशीम अधिक ३२% आणि यवतमाळ जिल्ह्यात अधिक ३८% पावसाची नोंद झाली आहे तर अकोला जिल्ह्यात ५१%, बुलढाणा ०३% कमी आणि गोंदिया १% कमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. विदर्भातील या सर्व जिल्ह्यात झालेल्या पावसाची एकूण टक्केवारी अधिक १९ टक्के आहे. तर गेल्यावर्षी जून महिन्यात उणे एक टक्का पाऊस कमी झाला होता.