नागपूर - वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एका चुकीमुळे नशिबी आलेल्या अपंगत्वाचा बाऊ न करता प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर नागपुरातील एका दिव्यांग व्यक्तीने शून्यातून केलेली सुरवात आज हजारो लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जयसिंग चव्हाण असे या यशस्वी उद्योजकाचे नाव आहे. जयसिंग चव्हाण यांना दोन्ही पाय नसतानासुद्धा काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि धडपड स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून त्यांनी घरोघरी जाऊन साबण विकण्याचे काम सुरू केले. इथून सुरू झालेला प्रवास आजही सुरूच आहे. मात्र, आज त्यांची गणना नागपुरातील यशस्वी उद्योजक म्हणून केली जाते. राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्ताने आम्ही त्यांचा संघर्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
इच्छा तेथे मार्ग
'इच्छा तेथे मार्ग' हा वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. एखाद्याला नवी उमेद द्यायची असेल तर, या वाक्प्रचाराचा उपयोग केला जातो. यालाच प्रत्यक्षात उतरवत आपल्या शारीरिक व्याधीतही यशाची पायरी चढत जयसिंग चव्हाण यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. कधीकाळी पोट भरण्यासाठी मिळेल ते काम स्वीकारण्याची त्यांनी तयारी असायची. मात्र, शरीराने दिव्यांग असल्यामुळे त्यांना काम मिळणेदेखील कठीण झाले होते. मात्र, या व्याधीला आपल्या जीवनाची दुर्बलता न बनू देता जयसिंग यांनी कोट्यधीश होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे.
हेही वाचा - खुशखबर.. पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना काळ्या बिबट्याचे पुन्हा दर्शन
'आपणही काम करू शकतो' ही उर्मी
नागपुरातील जयसिंग चव्हाण यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहानपणी पोलिओची चुकीची लस दिली गेल्यामुळे जयसिंग यांना विविध शारीरिक व्याधी झाल्या. हळूहळू या व्याधींवर मात करत ते आज एक उत्तम उद्योजक म्हणून कार्य करत आहेत. त्यांना त्यांच्या कार्यासाठी शासनाकडून विविध पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आले आहे. लहानपणी देण्यात आलेल्या एका चुकीच्या डोसमुळे जयसिंग चव्हाण यांच्या हात, पाय व डोक्याला शारीरिक व्याधी जडल्या. त्यामुळे ते पूर्णतः अस्वस्थ झाले. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले जयसिंग हे नागपुरातील एका छोट्याशा चाळीत राहायचे. शारीरिक कमकुवततेमुळे ते इतरत्र जात नव्हते. हळुहळू त्यांनी मनाशी निश्चय करत वयाच्या १८ व्या वर्षी 'आपणही काम करू शकतो' या उर्मीतून व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी साबण विकायला सुरूवात केली.
कंपनीला आग लागल्यानंतर सर्व संपले, तरीही पुन्हा जिद्दीने भरारी
दिव्यांगांना मिळणाऱ्या सायकलचा वापर करत ते घरोघरी जाऊन व्यवसाय करू लागले. परंतु, किती दिवस घरोघरी जाऊन व्यवसाय करायचा, या प्रश्नातून त्यांनी वाट काढत स्वतःचा व्यवसाय सुरू केला. छोटेखानी उद्योगाला सुरुवात केली. शारीरिक शक्ती नसतानाही डोक्याचा वापर करत उद्योगाला उभारी देण्याचे काम चव्हाण यांनी केले. त्यानंतर स्वतःकडे लक्ष देत त्यांनी हात आणि डोक्याच्या व्याधीवर मात करत पहिला विजय मिळविला. मात्र या काळात व्यवसायदेखील सुरूच होता. परंतु फारसे यश मिळत नव्हते. अशातच २०१० साली त्यांच्या कंपनीला आग लागली. त्यात सर्व जळाले. जयसिंग यांना मोठी निराशा वाटू लागली. परंतु आगीनंतर सकारात्मकेची धग स्वतःत निर्माण करत त्यांनी घरच्यांच्या मदतीने पुन्हा व्यवसायाला सुरूवात केली. नंतर व्यवसाय उभारी घेऊ लागला.
दिव्यांग असूनही उत्तम उद्योजक बनण्याची किमया साधली
शारीरिक समाधान नसले तरी मनाला मात्र प्रचंड आनंद होत होता. या सगळ्या काळात जयसिंग यांनी उद्योग क्षेत्रातील लहान-सहान बाबींचा कसून अभ्यास केला आणि याच अभ्यास व दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर जयसिंग यांनी दिव्यांग असूनही एक उत्तम उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला. आज जयसिंग यांच्याकडे विविध उद्योग आहेत. ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. तसेच, साबणाचा कारखाना, एमआयडीसी फॅक्टरी, रेस्टॉरंट वस्तू पुरवठा, स्मॉल स्केल इंडस्ट्रियल सप्लाय हेही व्यवसाय ते करतात. कधीकाळी चाळीत राहून ये-जा करणाऱ्यांकडे पाहणारा माणूस आज अनेकांना उद्योगाबाबत मार्गदर्शन करतो. हे सगळं घडलय त्यांच्यात असलेल्या आत्मविश्वास व विचारशील कृतीमुळे. त्यामुळे अनेक दिव्यांगासाठी जयसिंग व त्यांचे कार्य हे नवा आत्मविश्वास देणारे ठरत आहे. शिवाय दिव्यांग बंधू-भगिनींनी फक्त शासनाच्या योजनेवर अवलंबून न राहता. आपल्या कर्तृत्वशक्ती चालना देऊन स्वतःला घडवावे, अशी मार्मिक भावना जयसिंग चव्हाण यांनी ईटीव्ही भारतकडे बोलून दाखविली आहे.
हेही वाचा - दाऊद इब्राहिमच्या लोटेतील मालमत्तेचा लिलाव, ग्रामस्थ रविंद्र कातेंनी जिंकली बोली