नागपूर- शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत एक असे उदाहरण सादर केले आहे, ज्याचे दाखले अनेक वर्षांपर्यंत दिले जाणार आहेत. ज्याच्या जगण्याने आणि मरणाने समाजाला कोणताही फरक पडत नाही अशा रस्त्यावर फिरणाऱया एका वेडसर व्यक्तीच्या जीवनाला नवे-रूप मिळवून देण्याचे काम पोलिसांनी केले आहे.
पोलिसांविषयी गुन्हेगारांच्या मनात दहशत आणि सर्वसामान्यांच्या मनात आदर असावा. पण सध्याची परिस्थिती या उलटच बघायला मिळते. सर्वसामान्यांच्या मनात पोलीस या नावाची दहशत आणि गुंडांच्या मनात पोलिसांची तीळभरही भीती नसल्याचे चित्र आहे. समाजातील पोलिसांविषयीची ही नकारात्मक ओळख पुसून नवी ओळख निर्माण करण्यासाठी गेल्या काही काळात प्रयत्न सुरू झाले आहे. त्याच अनुषंगाने नागपूरच्या बजाज नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रागवेन्द्र क्षीरसागर यांनी एका मनोरुग्ण व्यक्तीचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे.
रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करताना रागवेन्द्र क्षीरसागर यांना केस वाढलेला आणि हिंसक वृत्तीचा एक वेडसर पुरुष दीक्षाभूमी परिसरात फिरताना दिसला. त्या वेडसर व्यक्तीने परिधान केलेल्या कापडांमधून दुर्गंधी येत असल्याने त्याच्या जवळ जाणे शक्य होत नव्हते. तरी देखील क्षीरसागर आणि कर्मचाऱ्यांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले. एका नाव्ह्य़ाला बोलावून त्याचे वाढलेले केस कापले. त्याला अंघोळ घातल्यानंतर पांढरे शुभ्र कापडे त्याला घालण्यात आले. त्यानंतर त्याचे रूप बघून कुणालाही विश्वास बसत नव्हता की हा तोच वेडसर व्यक्ती आहे.
पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने त्याची रवानगी नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात करण्यात आली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे उन्हातान्हात भटकणाऱ्या एका मनोरुग्ण व्यक्तीला नवे-जीवन प्राप्त झाले आहे.