नागपूर - जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील आमगाव-देवळी येथील नाल्यात दोन शाळकरी विद्यार्थी बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आरुषी नामदेव राऊत (वय, १०) आणि अभिषेक नामदेव राऊत (वय, ७) अशी मृत बहीण-भावांचे नाव आहे. एकाच कुटूंबातील दोन्ही मुलांना एकाच वेळी गमावल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
दोन्ही मुले कालपासून होते बेपत्ता
हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत आमगाव-देवळी हे गाव आहे. गावातील रहिवासी नामदेव राऊत यांचे दोन्ही मुले कालपासून बेपत्ता होते. या संदर्भात हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. नामदेव राऊत हे गावातील नागरिकांसोबत आज सकाळ पासुनच गाव शिवारात मुलांचा शोध घेत होते. दरम्यान दोघांचे कपडे आणि चप्पल नाल्याच्या शेजारी दिसून आले, त्यानंतर या संदर्भात हिंगणा पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने नाल्यात शोध घेतला असता, दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यात आढळले आहे. नामदेव राऊत हे शेतमजूर असून, ऐकाच वेळी त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना गमावल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अभिषेक आणि आरुषी या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठवले आहेत.
मासोळी पकडण्यासाठी गेले होते नाल्याकाठी
गावातील लोकांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार अभिषेक आणि आरुषी हे दोघेही कोंबडीच्या मागे पळत असताना नाल्या शेजारी गेले असावेत. तेव्हा त्या ठिकाणी मासोळ्या दिसून आल्याने त्या पकडण्यासाठी ते दोघेही पाण्यात उतरले असताना बुडाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र या बाबत पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.
हेही वाचा - पुन्हा नकोशी.! देवळा येथील वासोळ्यात सापडले स्त्री जातीचे अर्भक; कुत्रा चावल्याने जखमी