नागपूर - राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात सत्ताधारी शिवसेना आंदोलनाच्या भूमिकेत आली आहे. यासंदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये, तसेच पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात मोर्चा काढण्यापूर्वी राज्य सरकारने इंधनावरील टॅक्स कमी केले पाहिजेत. त्यातून जनतेला दिलासा मिळेल. तसेच शिवसेना नेत्यांना आंदोलन करण्याची गरजही भासणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज्याचे कर कमी करावा -
राज्यात पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळ गेले आहेत. तर, डिझेलदेखील त्याच मार्गावर आहे. शिवाय गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी देखील मिळणे जवळजवळ बंद झाल्याने सर्ववसमान्य नागरिकांची कोंडी झालेली आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिलासा मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, ते देखील होऊ न शकल्याने आता इंधनाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. यावर शिवसेना आता मोर्चा काढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारने राज्याचे कर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. आमचे सरकार सत्तेत असताना टॅक्स कमी केले होते. त्यामुळे त्यावेळी दोन रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले होते.
सरकारने वॅट कमी करावा -
पेट्रोल-डिझेलवर सर्वाधिक वॅट हा राज्य सरकारकडून आकारला जातो आहे. पेट्रोल आणि डिझेल अजूनही जीएसटीच्या अंतर्गत आले नसल्याने दर वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने आवश्यक ती पावले उचलण्याची गरज असून जनतेला दिलासा मिळेल, असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - कोकणात होतय ब्लॅक राईसवर संशोधन; बदलू शकते शेतकऱ्यांचे अर्थकारण