नागपूर - शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख रविनिश पांडे उर्फ चिंटू महाराज यांच्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. 'ईटीव्ही भारत' ने या प्रकरणाला वाचा फोडली होती.
आरोपी चिंटू महाराज हा आदित्य ठाकरे यांच्या 'आदित्य संवाद' या कार्यक्रमात कायद्याची तमा न बाळगता फिरत असल्याची बातमी दाखविण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविनिश पांडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून तसे आदेश काढण्यात आले आहेत.
नेमका काय आहे प्रकार जाणून घ्या
२५ ऑगस्टच्या रात्री माथनी टोल नाक्याजवळ रात्री १ ते २ वाजण्याच्या दरम्यान वाळूचे ट्रक थांबवून त्यांचा तपास सूरु केल्याचा रविनिश पांडे यांच्यावर आरोप आहे. त्यादरम्यान त्यांनी काही चालकांकडून खंडणी देखील मागितली होती. त्याच्या विरोधात मौदा पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मगितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो फरार झाला होते. फरार असताना तो आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत दिसून आल्याचे ईटीव्ही भारत ने समोर आणले होते.
दरम्यानच्या काळात त्याने स्वतःचा जामीन घेत तो निर्दोष असल्याचा दावा केला होता. एवढच नव्हे तर शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधवसुद्धा रविनिश पांडे यांच्या समर्थनात पुढे आले होते. मात्र याकडे लक्ष न देता रविनिश पांडे याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.