नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा १६ जूनला समारोप होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमाला उद्योगपती रतन टाटा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघाकडून रतन टाटा यांना तृतीय संघशिक्षा वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. गेल्या वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.
संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गासाठी यंदा ८२८ स्वयंसेवक तसचे विविध वर्गातील प्रशिक्षणार्थी संघ मुख्यालयात आले आहेत. रेशीमबाग मैदान कवायतींनी गजबजला आहे. स्मृती मंदिर परिसरात हा वर्ग घेण्यात येत आहे. निवडणुकीच्या धामधुमीमुळे १ दिवस उशिराने हा वर्ग सुरू झाल्याचे कारण सांगितले जात आहे. महर्षी व्यास सभागृहात सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांच्या हस्ते या वर्गाचा शुभारंभ झाला.