नागपूर - मुख्य रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून एका व्यक्तीला ४० लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रेल्वे सुरक्षा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २८ लाख रुपये रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
बाळासाहेब घाटोळे (वय ६०) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव असून ते नागपूरचे रहिवासी आहेत. नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेमधून ते प्रवास करत होते. रेल्वे पोलीस दलाचे कर्मचारी प्लॅटफॉर्मवर गस्त घालत असताना बाळासाहेब घाटोळे यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली त्यावेळी त्यांच्याकडे ४० लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि २८ लाख रुपये रक्कम आढळून आली. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच याबाबतची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. हे सर्व कुठून आणले आणि कुठे घेऊन जात होते? याबाबत आयकर विभाग चौकशी करणार आहे.