नागपूर - कोतवाली पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या आकाश मॉल या रेडिमेट कपड्याच्या दुकानात झालेल्या चोरीच्या घटनेत एका चोरट्याने दोन लाखांची रोकड लंपास केली आहे. विशेष म्हणजे चोरट्याने सिलिंग वर असलेल्या कुलरच्या डक्टिंगमधून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने दुकानातील महागडे कपडे परिधान करून दोन लाखांची रोकड लंपास केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या महाल परिसरात आकाश मॉल नावाचे शोरूम आहे. रविवार आणि गणपतीचे आगमन असल्याने दोन दिवस दुकान बंद होते, या दरम्यान एका चोराने सिलिंग वर असलेल्या कुलरच्या डक्टिंगची जाळी तोडून दुकानात प्रवेश केला. ज्या ठिकाणी उभं राहणे देखील शक्य नाही, त्या ठिकाणातून चोरटा दुकानात शिरलाच कसा याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दुकानात शिरल्यानंतर चोराने सर्व सामान अस्त्यावस्त फेकायला सुरवात केली. त्यानंतर त्याने दुकानाच्या कॉउंटरमध्ये असलेलली दोन लाखांची रक्कम काढून घेतली. यानंतर दुकानातील बाथरूम मध्ये अंघोळ केली आणि दुकानातील महागडे कपडे परिधान केले. यानंतर चोराने काही कपडे बॅग मध्ये भरून पोबारा केला. हि सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून तो आरोपी रेल्वेस्टेशन परिसरात नवीन कपडे घालून फिरत असल्याचे आढळून आले आहे. आकाश मॉलमध्ये चोरी कारण्यापूर्वी त्याने आणखी एका दुकानात चोरी केली आहे. मात्र, त्या दुकानातून फारसे काही चोराच्या हाती लागले नाही. विशेष म्हणजे याच पद्धतीच्या चोरीची घटना अमरावती शहरात घडली होती, त्या प्रकरणातील आरोपी मोकाट असल्याने तोच चोर नागपूरच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.