नागपूर - उपराजधानी नागपुरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता आरोग्य व्यवस्था कमी पडत असून ताण प्रचंड वाढला आहे. अनेकवेळा रूग्णांना घरी पाठवण्याची वेळ डॉक्टरांवर येते. ही बाब शासन आणि प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी नागपूर मेडिकल कॉलेज अथवा शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी रविवारी रात्री 9 वाजता कॅज्युल्टी विभागासमोर धरणे दिले. अपुऱ्या व्यवस्था असल्याने रूग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत. बेड, ऑक्सिजन, रेमडेसीवीर उपलब्ध करून ठोस उपाययोजना जिल्हा प्रशासनाने कराव्यात, अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे.
रूग्णांसाठी डॉक्टरांचे धरणे
नागपुरात दररोज किमान पाच हजारापेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. तर 60 ते 65 रूग्ण कोरोनामुळे दगावत आहे. 55 हजारपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असून दररोज रूग्णलयासमोर वेटिंग लिस्ट पाहायला मिळत आहे. खासगी असो किंवा शासकीय मेडिकल हॉस्पिटल किंवा मेयो हॉस्पिटल, याठिकाणी बेड उपलब्ध नसल्याने अनेक गरजू रूग्णांना परत पाठवावे लागत आहे. आवश्यक त्या सुविधा देण्याची मागणी रूग्णांच्यावतीने या निवासी डॉक्टरांनी केली आहे..
40 निवासी डॉक्टरांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला. गरीब आणि गरजू रूग्णांसाठी जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. यासोबत मेडिकल, मेयो व्यतिरिक्तसुद्धा रूग्णांना बेड उपलब्ध करून द्यावेत. दिवस-रात्र काम करूनही आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याने अनेक अडचणी येत आहेत. रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही काम बंद करणार नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे. आज (सोमवारी) ते मनपा आयुक्तांची भेट घेऊन याबद्दल चर्चा करणार असल्याची माहिती दिली जात आहे.
हेही वाचा - राज्यात 63 हजार 294 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 349 मृत्यू