नागपूर - येथील प्रवासी नसलेल्या मेट्रोत चक्क प्री-वेडिंग फोटोशूट करण्यात आल्याचे फेसबुक व्हिडिओमधून समोर आले आहे. सदर जोडप्याने आणि फोटोग्राफरने मेट्रो ट्रेनमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम आटोपून टाकला आहे. तर, प्री-वेडिंगसाठी सुंदर आणि आकर्षक डेस्टिनेशनकरता हजारो रुपये मोजणाऱ्या फोटो कलाकारांनी चक्क फुकटात प्रवासी नसलेल्या मेट्रोत फोटोशूट उरकून टाकल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

प्री-वेडिंग शूट ते सुद्धा चक्क मेट्रोमध्ये करण्याची भन्नाट कल्पना या जोडप्याला आणि त्यांच्या फोटोग्राफरला सुचली. नागपुरातील एका प्रवासी नसलेल्या मेट्रोत हे प्री-वेडिंग फोटेशूट करण्यात आले. त्यानंतर लगेचच ते फोटो फेसबुकवर व्हायरल झाल्यामुळे प्री-वेडिंग शूट करिता नवा पर्याय उपलब्ध झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. तर, प्रवाशांनी पाठ फिरवलेल्या नागपूर मेट्रोचा आणखी एक चांगला उपयोग होऊ शकतो हे नागपूरातील कलाकारांनी शोधून काढले आहे. सार्वजनिक ठिकाणी फोटो काढण्यात काही गैर नाही. आता मेट्रोचा असाही वापर करता येईल, हे या निमित्ताने समोर आले आहे. मात्र, धोकादायकरीत्या फोटो न काढणे तसेच, स्वतःच्या आणि लोकांच्या जिवाशी खेळ न करण्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.
हेही वाचा - शिवाजी महाराजांचा आधुनिक 'प्रपातगड',नागपुरात दिवाळीनिमित्त काल्पनिक किल्ल्याचे प्रात्यक्षिक
या जोडप्याला लग्नाच्या आधी प्री-वेडिंग शूट करण्याची इच्छा झाली, मग फोटो शूट करण्यासाठी चांगल्या डेस्टिनेशनचा शोध सुरू झाला. यातच नागपूर मेट्रोने शहरात अनेक आकर्षक मेट्रो स्टेशन तयार केले आहेत, ज्याची भुरळ सर्वांनाच पडली आहे. शहराबाहेर जाऊन शूट करण्याऐवजी चक्क प्रवाशी नसलेल्या मेट्रोत जाऊन फोटोशूट करण्याची कल्पना त्यांना सुचली, मग काय लागलीच फोटोशूट आटोपून टाकण्यात आला. ते फोटो फेसबुकवर व्हायरल झाल्यानंतर प्री-वेडिंग शूट करिता नवा पर्याय उपलब्ध झाल्याच्या चर्चेला उधाण आले. प्री-वेडिंग शूटच्या या भन्नाट कल्पनेचा वापर रेल्वे प्रशासन प्रवाशांना मेट्रोकडे आकर्षित करण्यासाठी करते का, याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे. शिवाय, अशा फोटोशूटच्या माध्यमातून कमाईचा आणखी एक पर्याय मेट्रोला मिळू शकतो, यात शंका नाही.
हेही वाचा - निवडणुकीतील पराभवामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा