नागपूर - नागपूर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कोरोना विरुद्ध लसीकरणाची आजपासून सुरवात करण्यात आली. नागपूर पोलीस दलाचे अप्पर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त दिलीप झलके व पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप पखाले यांनी स्वतः लस घेऊन मोहिमेचा शुभारंभ केला.
हेही वाचा - वरातीमागे घोडे! राज्यात इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात आंदोलन
नागपूर पोलीस मुख्यालयातील पोलीस रुग्णालयात कोरोना विरुद्ध लसीकरणाच्या मोहिमेची सुरवात करण्यात आली. फ्रंटलाईन कोरोना योद्धा म्हणून सुरवातीला आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी करोना लसीकरणाची सुरवात करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलीस कर्मचाऱ्यांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
दर दिवसाला २०० पोलिसांना लावली जाणार लस
नागपूर पोलीस दलात सुमारे ८ हजार पोलीस कर्मचारी-अधिकारी कार्यरत आहेत. आज पहिल्या दिवशी एका केंद्रावर ही सुविधा उपलब्ध असून पुढील आठवड्यापासून शहरातील १६ केंद्रावर पोलिसांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. दररोज सुमारे २०० पोलिसांना लसीकरणाचे लक्ष्य नागपूर पोलीस दलाने ठेवले आहे. इच्छुक पोलीस कर्मचाऱ्याला प्रथम नोंदणी करावी लागेल, त्यानंतर मोबाईलवर संदेश आल्यावर पिनकोडनुसार महापालिकेच्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करता येणार आहे.
हेही वाचा - 'राजकीय फायद्यासाठीच नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा निर्णय रद्द'