नागपूर - घरफोडी, वाहनचोरी आणि दरोडेखोरांच्या दोन मोठ्या टोळ्या जेरबंद करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आली असून ६ आरोपी हे अल्पवयीन आहेत. आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांनी एकूण १४ गुन्ह्यांचा छडा लावला आहे.
जेरबंद केलेल्या टोळ्यांमध्ये दरोडा घालणारी आणि वाहन चोरी करणाऱ्या अशा या दोन मोठ्या टोळ्या आहेत. पोलिसांनी दरोडा घालणाऱ्या टोळीकडून सुरा, एका लाख पेक्षा जास्त रोकड जप्त केली आहेत, तर वाहन चोरी करणाऱ्या टोळीकडून १० पेक्षा जास्त दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. त्याच बरोबर वाहन चोरीच्या घटनांचे प्रमाण देखील वाढल्याने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी गुन्ह्याच्या ठिकाणी नियोजन बद्ध पद्धतीने सापळा रचून आरोपीचा शोध घेतला. त्याच वेळी एक विधिसंघर्ष बालक चोरीच्या वाहनासह आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा ३ विधी संघर्ष आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेले चारही विधी संघर्ष आरोपी हे यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे असून त्यांच्यावर नागपूरच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंद आहे. पोलीसांनी त्यांच्या जवळून चोरीच्या १० दुचाक्या,७ मोबाईल असा ५ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपींची चौकशी करण्यात आली तेव्हा आरोपींची सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. यासह नंदनवन, गणेशपेठ, मानकापूर आणि कळमना येथे २ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.. या शिवाय पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील ५ आरोपींना अटक केली. यामध्ये सुद्धा २ अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळून १ लाख १९ हजारांच्या मुद्देमाल जप्त केला आहे. या मध्ये ५ मोबाईलसह एक दुचाकी आणि दरोड्यात उपयोगी येणारे शस्त्र देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. दरोड्यातील आरोपी हे रात्रीच्या वेळेस शस्त्रांचा धाक दाखवून लोकांना लुटायचे.