नागपूर - शाळेतून घरी जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनीसोबत स्कूल व्हॅनमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाची नागरिकांनी बेदम धुलाई केली. आशिष मनोहर वर्मा असे वाहन चालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. पीडित विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पीडित विद्यार्थिनी ही सहा वर्षाची असून इयत्ता दुसरीत शिकत आहे. ती आणि तिचा भाऊ स्कूल व्हॅनने शाळेत ये-जा करतात. इतर मुलांना घरी सोडल्यानंतर पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या भावाला आशिष वर्मा घरी सोडण्याकरिता निघाला होता. यानंतर, त्याने वाटेत स्कुल व्हॅन थांबवून पीडित विद्यार्थिनीच्या भावाला चिप्स आणायला दुकानात पाठवले. यानंतर नराधम वाहनचालक स्कुल व्हॅनमध्ये त्या विद्यार्थिनीसोबत लज्जास्पद चाळे करू लागला.
तिथून जाणाऱ्या एका मुलीच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्या मुलीने परिसरातील नागरिकांना गोळा करून त्यांना हा प्रकार सांगितला. चालकाच्या या वर्तनामुळे संतापलेल्या नागरिकांनी आरोपी आशिष वर्मा याला चोप दिला. घटनेची माहिती समजताच इमामवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.