नागपूर - साहेबरावची ऐटदार चाल बघण्याचे स्वप्न पाहणाऱ्या डॉक्टरांकडून आज नागपुरातील गोरेवाडा टायगर रेस्क्यू सेंटरमध्ये साहेबराव या 9 वर्षीय वाघावर शस्त्रक्रिया करण्यात आली. साहेबराव या वाघाच्या पायाला कृत्रिम पंजा बसवण्यात त्यांना यश आले. मात्र, साहेबरावने बसवलेला कृत्रिम पंजा लगेच काढून टाकला. त्यामुळे वैद्यकीय पथकाची थोडी निराशा झाली. कृत्रिम पंजा बसवण्याची ही जगातील पहिलीच घटना असल्याने सर्व वन्यप्रेमींचे याकडे लक्ष लागले होते.
सकाळी ८ वाजता शस्त्रक्रियेला सुरुवात -
गोरेवाडा रेस्क्यू सेन्टरमध्ये साहेबरावला कृत्रिम पंजा बसवण्यात आला. मनुष्यावर ऑपरेशन करून त्याला होणारी वेदना कमी करण्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असेन. मात्र, वाघाला झालेली दुखापत आणि त्यामुळे त्याला होणारी वेदना कमी करण्यासाठी आज सकाळी ८ वाजता शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, अर्धवट शुद्धीवर येताच त्याने पाय झटकून पंजा काढला. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
संपूर्ण शुद्धीत येण्यापूर्वीच काढला पंजा -
साहेबराववर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला कृत्रिम पंजा बसवण्यात आला. मात्र, साहेबराव अर्धवट शुद्धीवर येताच त्याला पायाला लागलेला कृत्रिम पंजा दिसला. त्यामुळे त्याने लगेच पाय झटकून पंजा काढला.
'असा' मोडला होता साहेबरावचा पंजा -
साहेबराव हा २०१२ मध्ये नागपूरच्या वन विभागाला ट्रॅपमध्ये अडकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यावेळी त्याचा पंजा मोडलेला होता. त्याला नीट चालता येत नव्हते. त्याला खूप वेदना होत असल्याने तो सारखा रडत असायचा. त्याला सर्वप्रथम नागपूरच्या महाराजबाग प्राणि संग्रहालयात ठेवण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याची परिस्थिती पाहता त्याला गोरेवाडा पार्कमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी ऑक्टोबर महिन्यात त्याच्या पंजावर शस्त्रक्रिया केली. त्यामुळे त्याच्या वेदना कमी झाल्या होत्या. साहेबरावला नीट चालता यावे यासाठी डॉक्टरांनी त्याला कृत्रिम पंजा बसवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी इतर विदेशी डॉक्टरशी संपर्क साधून शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले.