नागपूर Ojas Deotale Interview : बर्लिन इथं पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत नागपूरच्या ओजस देवतळे या प्रतिभावान खेळाडूनं सुवर्ण पदकाचा वेध घेत स्पर्धा गाजवली. ओजसच्या सुवर्ण कामगिरीमुळे जागतिक तिरंदाजी क्रमवारीत त्यानं अव्वलस्थानी झेप घेतल्यानं नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक कामगिरी करणारा ओजस पहिला भारतीय तिरंदाज ठरला आहे. त्यामुळे भविष्यात ओजस ऑलम्पिक स्पर्धेत विश्वविक्रमी कामगिरी करुन भारतासाठी मेडलची लूट करणार अशी आशा निर्माण झाली आहे. नागपूर सारख्या महानगरात तिरंदाजी खेळासाठी बेसिक सोयीसुविधा उपलब्ध नसल्यानं ओजसला साताऱ्यात राहून प्रशिक्षण घ्यावं लागतं असल्याची खंत त्यानं बोलून दाखवली आहे.
देशाला मिळवून दिलं सुवर्णपदक : जर्मनीच्या बर्लिन इथं संपन्न झालेल्या तिरंदाजीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 21 वर्षीय ओजसनं अंतिम फेरीत 150 पैकी 150 गुणांसह अचूक नेम लावला. त्यामुळे पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात त्यानं देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. अंतिम सामन्यात ओजसचा आणि पोलंडच्या लुकाज झिबीलस्की या खेळाडूंसोबत सामना रंगला. लुकाज झिबीलस्कीनं 150 पैकी 149 गुण मिळवत ओजस समोर स्पर्धेत जोरदार आव्हान उभं केलं. ओजसनं देखील चोख प्रतिउत्तर देत 150 पैकी 150 गुण प्राप्त करत गोल्ड मेडलवर कब्जा केला. याच बरोबर ओजसनं जागतिक क्रमवारीत देखील पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
नागपुरात नाहीत आवश्यक सोयीसुविधा : तिरंदाजी खेळासाठी नागपुरात बेसिक सोयीसुविधाच उपलब्ध नाहीत. त्यामुळे पाहिजे तसा सराव करता येत नसल्यानं ओजसनं सातारा येथील प्रशिक्षण संस्थेत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय आज सार्थकी लागला आहे. सातारा इथं ओजसच्या खेळात मोठा सुधार झाला आहे. परिस्थिती कशीही असो, अचूक नेम साधण्याची किमया त्यानं अवगत केली आहे.
ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारचं : ओजसनं वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत गोल्ड मेडलची कमाई केल्यानंतर आता त्यानं 2028 मध्ये होणाऱ्या ऑलम्पिककडं लक्ष केंद्रीत केलं आहे. कुठल्याही परिस्थितीत भारताला गोल्ड मेडल मिळवून देण्याचं स्वप्न उराशी बाळगून ओजसनं तयारी सुरू केली आहे.
निवड चाचणीत नवा विक्रम : भारतीय धनुर्विद्या संघटनेतर्फे हरियाणाच्या सोनिपत येथील साई स्टेडियममध्ये निवड चाचणीसाठी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात ओजसनं 1440 पैकी 1423 गुणांची नोंद करून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. महत्वाचं म्हणजे या अगोदर हा रेकॉर्ड 1419 गुणांचा होता.
हेही वाचा :