नागपूर : आपल्या देशाला वैज्ञानिकांची गौरवशाली पंरपरा लाभली आहे. देशात विज्ञानाची ही परंपरा पुढे नेण्यात भारतीय विज्ञान काँग्रेसची भुमिका मोलाची ठरली आहे. आपण साऱ्यांनी ही गौरवशाली परंपरा पुढे नेऊ या, अशा शब्दात नोबेल पुरस्कार विजेत्या ॲडा योनाथ (Nobel Prize winner Ada Yonath) यांनी वैज्ञानिकांना साद घातली. (Ada Yonath speech). राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजीत 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा आज समारोप झाला. (Indian Science Congress in Nagpur). याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून ॲडा योनाथ बोलत होत्या. यावेळी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी,नागपूर विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, भारतीय विज्ञान काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अरविंद सक्सेना आदी उपस्थित होते.
भारतीय वैज्ञानिक परंपरेची ओळख झाली : नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरही 20 वर्षांपासून मी माझे संशोधन सातत्याने करीत आहे. संशोधकाने आपले संशोधन कधीही थांबवायचे नसते. या संशोधन कार्यात भारतीय वैज्ञानिक डॉ. तनया बोस, डॉ. वेंकटरमण रामकृष्णन यांची मदत झाली. भारतीय वैज्ञानिकांबद्दल मला नेहमीच आदर राहिला आहे. माझे मार्गदर्शक डॉ. रामचंद्रन हे एक भारतीय वैज्ञानिक होते. त्यांच्याकडूनच मला महान भारतीय वैज्ञानिक परंपरेची ओळख झाली. हीच महान व गौरवशाली परंपरा पुढे नेण्यात 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसने मोलाची भूमिका बजावली आहे. ही परंपरा आपण पुढे नेऊ या, असे आवाहन ॲडा योनाथ यांनी केले.
प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन : नागपुरातील आयोजनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन विज्ञानाचा सेतू निर्माण केला. प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेस आयोजन झाले. त्यास सर्वस्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला. मध्यवर्ती संकल्पनेस अनुसरुन हे आयोजन यशस्वी झाले. 3 हजारांहून अधिक शोधनिबंध सादर झाले तर 50 हजारहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले. सर्वच दृष्टीने हे आयोजन यशस्वी झाल्याचे समाधान डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी व्यक्त केले.
विज्ञान काँग्रेस मशाल सुपूर्द : समारोपीय कार्यक्रमाच्या शेवटी मावळत्या अध्यक्ष डॉ विजयलक्ष्मी सक्सेना यांनी भारतीय काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ अरविंद सक्सेना यांच्याकडे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पुढील आयोजनाची मशाल सूपूर्द केली.
या वैज्ञानिकांना पुरस्कार प्रदान : 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी विविध श्रेणींमध्ये वैज्ञानिकांना सन्मानित करण्यात आले.
सुवर्णपदके विजेत्यांची नावे खालील प्रमाणे -
- आशुत मुखर्जी मेमोरियल अवॉर्ड - प्रा. अजय कुमार सूद
- डॉ. सी. व्ही. रमण जन्मशताब्दी पुरस्कार - प्रा. एस. आर. निरंजना
- एस. एन. बोस जन्मशताब्दी पुरस्कार – प्रा. सुभाषचंद्र पारिजा
- एस. के. मित्रा जन्मशताब्दी पुरस्कार – डॉ. रंजन कुमार नंदी
- एच. जे. भाभा स्मृती पुरस्कार – डॉ. कौशल प्रसाद मिश्रा
- डी. एस. कोठारी मेमोरियल पुरस्कार – डॉ. श्यामल रॉय -
अन्य पुरस्कार विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे -
- प्रो. आर. सी. मेहरोत्रा मेमोरियल लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड – डॉ. यू. सी. बॅनर्जी - एमिटी युनिव्हर्सिटी, मोहाली.
- प्रो. एस. एस. कटियार एंडोमेंट लेक्चर अवॉर्ड – डॉ. केस्तुरू एस. गिरीश – तुमकूर विद्यापीठ, कर्नाटक.
- प्रा. अर्चना शर्मा मेमोरियल अवॉर्ड इन प्लांट सायन्स – डॉ. राजीव प्रताप सिंग - बीएचयू, वाराणसी
- जी. के. मन्ना मेमोरियल पुरस्कार – डॉ. बसंत कुमार दास – आय.सी.ए.आर. कोलकोता